उदगीर येथील उपनिबंधक कार्यालयातील (बैनामा ऑफिस) भ्रष्टाचार बंद करा – मागणी

उदगीर येथील उपनिबंधक कार्यालयातील (बैनामा ऑफिस) भ्रष्टाचार बंद करा - मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील बोगस कागदपत्रांच्या आधारे एकाच जागेचे पुन्हा पुन्हा होणारी नोंदणी, अर्थात पारंपारिक शब्द बैनामा केला जातो आहे. ज्यामुळे कित्येक लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. एक तर खोटे दस्तावेज असल्यामुळे मूळ मालक बाजूलाच राहतो, आणि तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा त्याच जागेच्या नोंदणी दलालामार्फत केल्या जात आहेत. याला विरोध करण्यासाठी बहुजन विकास अभियानच्या वतीने अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वीही वेगवेगळी आंदोलने करून या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला.
तसेच उदगीर शहर आणि परिसरातील बोगस गुंठेवारी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवल्यानंतर रजिस्ट्री ऑफिस मध्ये कोणतीही नोंदणी होणार नाही. अशा पद्धतीचे आदेश पारित करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या या आदेशाला कोलदंडा देऊन काही ठराविक दलालांना हाताशी धरून नोंदणी झाल्याची बाब बहुजन विकास अभियानने जाहीर केली असून याप्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
तसेच जाहीर आरोपही बहुजन विकास अभियान यांच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वसामान्य माणसाची लूट थांबवण्यासाठी आणि खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या दलाल आणि अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तीव्र कारवाई केली जावी. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जावे, म्हणून अर्ध नग्न आंदोलन केले.
या बोगस आणि खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बुरखा पाडण्यासाठी आपल्या अंगावरील कपडे आपण उतरवले आहेत, असा खुलासा आंदोलकांनी केला आहे. तसेच या कार्यालयातील दलालांचा वाढलेला सुळसुळाट थांबला पाहिजे, आणि अधिकाऱ्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला आहे.
नियमबाह्य दस्त नोंदणीची जोपर्यंत चौकशी होणार नाही, दलालांच्या कोट्यावधीच्या संपत्तीच्या आयकर विभागाकडून चौकशी केली जावी. गेल्या वीस वर्षांपासून या दलालांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणमत करून सर्वसामान्य माणसांना अंधारात ठेवून अनेक दस्त नियमबाह्य नोंदणी केलेले आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याच्या नावाने ही नोंदणी करण्याचा प्रताप या कार्यालयाकडून झालेला आहे!
या संदर्भातही गुन्हा नोंद झाला असून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. अशा पद्धतीने धडधडीत बोगस दस्त बनवण्याचे काम या कार्यालयातील दलाल करत आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदल्याच नाहीतर सरळ निलंबन न करता बडतर्फ करावे. अशा आग्रही मागणीसह आपल्या अठरा मागण्यांचे निवेदन बहुजन विकास अभियान यांच्या वतीने देण्यात आले आहे.
सदरील अभियानावर अभियान प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, राजकुमार कारभारी, नर्सिंग गुरमे, राजकुमार गाथाटे, नरसिंग नायडू, श्याम मसुरे, ज्ञानोबा कांबळे, अंबादास पाटील, पप्पू शेवाळे, सुनील पाटील, रवी डोंगरे, माधवराव शिंदे, बालाजी सूर्यवंशी, राजहंस लोणीकर इत्यादींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
तसेच आंदोलनातही सहभाग नोंदवला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे प्रकरण तात्काळ निकाली काढावे. अशी मागणी केली जात आहे. जोपर्यंत या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन गुन्हेगार असलेल्या अधिकारी आणि दलालांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, आंदोलनाचे स्वरूप बदलले जाईल. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन विकास अभियान सतत अग्रेसिव्ह राहील. असेही याप्रसंगी अभियान प्रमुख संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

About The Author