लक्ष्मीच्या पावलाने लाचेची रक्कम आली !!
दुर्दैवाने पोलीस उपनिरीक्षक मॅडमला अटक झाली !!!
लातूर (एल.पी.उगीले) : सामान्यतः प्रत्येक कार्यालयामध्ये पुरुष अधिकारी, कर्मचारी हे लाचेची मागणी बिनधास्तपणे करतात. असे समजले जाते. तसेच महिला अधिकारी यापासून दूर राहतात, असे म्हटले जाते. मात्र लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस स्टेशन हद्दीत कार्यरत असलेल्या रेणुका बालाजी जाधव या 31 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याने तक्रारदार यांना चक्क पंचाचे समक्ष स्वतःच्या राहत्या घरी बोलावून घेऊन तक्रारदार यास सात हजार रुपये लाचेची रक्कम मागितली, आणि तडजोड अंती शेवटी पाच हजार रुपयांची लाच निश्चित झाली.
पंचायत समक्ष लाचेची मागणी करण्यात आली होती, तक्रारदार यांना त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने तपास करून कोर्टात पाठविण्यात आलेल्या दोषारोप पत्राचा मोबदला, तसेच यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचे कडून भविष्यात संरक्षण देणे कामे त्यांना सतत सहकार्य करण्याचा मोबदला म्हणून या रकमेची मागणी करण्यात आली. आणि दुसऱ्याच दिवशी ठरलेली पाच हजार रुपये रक्कम पंचांच्या समक्ष रेणापूर बस स्थानकाच्या आवारात स्वीकारली.
याप्रसंगी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरच्या पथकातील सापळा अधिकारी लातूर प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड आणि त्यांचे पथक सज्ज होते.
तक्रारदाराने यासंदर्भातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागावर विश्वास ठेवून या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीची खात्रीही पंचा समक्ष झालेली होती. त्यासाठी सापळा रचण्यात आला होता. या सापळ्याने पोलीस उपनिरीक्षक रेणुका बालाजी जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर रेणापूर पोलीस स्टेशन येथे रीतसर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील कोणताही शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने मध्यस्थी करणारा त्रयस्त व्यक्ती काम करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैशाची मागणी करत असेल तर किंवा लाचेची मागणी करत असेल तर यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असेही आवाहन लातूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
