औसा तालुक्यात जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतशिवारातील पिके पाण्याखाली
औसा (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील लामजना, तपसेचिंचोली, गोटेवाडी, गाडवेवाडी, लाडवाडी, किल्लारी, बेलकुंड, नागरसोगा, उजनी सह परिसरात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.
परतीच्या पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली होती. यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पंचवीस वर्षांपूर्वीचे गावांतर्गत रस्ते वाहून गेल्याची घटना घडली. जोरदार झालेल्या पावसाने पिके पाण्यात तरंगत असल्याचे पाहून बळीराजा अस्वस्थ झालेला आहे. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पीक नुकसानीच्या पाहणीची व गोगलगाय प्रादुर्भावाचे नुकसानीची अद्यापपर्यंत कसलीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याची खंत शेतकरी वर्गातून केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी लामजना,तपसेचिंचोली परिसरात पावसाने विश्रांती दिल्यानंतर शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त होता. रिमझिम पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढले होते. परिणामी मजुरांची टंचाई जाणवत होती. कित्येक शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी करावी लागली. उन्हाळ्यासारखे ऊन, उष्णतेच्या कडक लाटा व घामाने नागरिक त्रस्त झाले होते.
रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलेच झोडपले , व हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली.या जोरदार पावसाने खरिप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी महागडी बियाणे ,दुबार पेरणी, मशागती, खते, फवारणी, मजुरीसाठी मोठा खर्च केलेला असून आलेल्या या अस्मानी संकटाला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
औसा तालुका कायम कमी पावसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो.यंदा जुलै- ऑगस्ट मध्ये संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आणि नागरसोगा परिसरात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला हा पाऊस इतका प्रचंड झाला की जणूकाही ढगफुटी या परिसरात झाल्याचे दिसून आले यामुळे परिसरात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. अचानक झालेल्या पावसाने जबरदस्त हजेरी लावत शेतकऱ्यांना व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला शुक्रवारी रात्री दीड तास ढगाचा गडगडात व विजेच्या कडकडाटसह पडलेल्या पावसाने ओढा, नाले, खटकाळी, लहान मोठे ओव्हळ तुडुंब भरून वाहू लागली तसेच दापेगाव साठवण तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे चित्र दिसून येत आहे नागरसोगा येथील ओढ्यावरील पुलावरून दोन-तीन फुट पाणी जात असल्याने जवळपास तीन तास प्रवासी वाहतूक थांबली गावाचा व वस्तीचा संपर्क तुटला गावातील नागरिकांनी गणेश मंदिरात आश्रय घेतला व काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले नागरसोगा येथील गायराणा लगतच्या वस्तीवर शेतातून पाणी येत असल्याने वस्तीवरील रस्त्याला जणू नाल्याची स्वरूप आले या भीतीने नागरिकांनी रात्र जागून काढली दोन दिवसापासून उकाडा जाणवत असताना पाऊस येईल असे वाटत होते. मात्र ढगफुटी सदृश्य होईल अशी जाणीव कोणालाही झाली नव्हती मात्र या पावसामुळे पिकास जीवदान मिळाले असले तरी उभ्या पिकात पाणी थांबल्याने कांदा, सोयाबीन, उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. ओढ्यावरील पूलाचा काही भाग वाहून खोचून गेले.
प्रशासनाच्या वतीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र मदत कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
