संदीप पवार यांना राष्ट्रीय स्तरावरील ” महर्षी घेरंड योग रत्न सन्मान ” पुरस्कार
उदगीर (एल.पी. उगिले) : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ देशातील सर्व राज्यात योग शिक्षण, योग शिक्षक यांच्या समस्या सोडविण्यासाठी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
संदीप स. पवार यांच्या कार्याची दखल घेऊन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी यांनी सदर पुरस्कार हा दि.५ सप्टेंबर रोजी संदीप सखाराम पवार यांना जाहीर केला.
संदीप स पवार हे अ. भा. योग शिक्षक महासंघ चे महाराष्ट्र राज्य सचिव असुन सखा क्रिडा मंडळ, कराटे आसोसिएशन चे अध्यक्ष आहेत, आणि योग क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात तज्ञ मार्गदर्शक व शिक्षक म्हणून कार्य करतात. ते जेष्ठ नागरिक व महिला, मुलींसाठी योग, स्वसंरक्षण प्रशिक्षण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. योग शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महासंघाच्या माध्यमातून ते प्रश्न मांडत आहेत.
योग प्रसार, प्रचार खेड्यातील नागरीकांना, मुलांना, शाळेत विद्यार्थी यांना योग शिक्षणाचे वर्ग मोफत घेऊन मार्गदर्शन करतात. त्यांनी नेहमीच समाजातील गोर, गरीब व गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या महामारीत अन्न-धान्य, कपडे व मिठाईचे वाटप केले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन जनजागृती केली. नागरिकांना मास्क, हॅण्डग्लोव्हज् व सॅनीटायझरचे वाटप केले. तसेच कोरोना रुग्णांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व्याख्यान व योगा प्राणायामचे धडे दिले.
त्यांचे हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य स्फुर्ती देणारे व सर्वांसाठी दिशादर्शक असून या कार्याची दखल घेऊन त्यांना महासंघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील “महर्षी घेरंड योग रत्न” सन्मान पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे योग शिक्षक व क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी, मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
