माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून महात्मा फुले महाविद्यालयातील ‘मिया वाकी’ उपक्रमाचे कौतुक
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी पाहणी करून लातूर जिल्हयातील महाविद्यालय पातळीवर सर्वप्रथम महात्मा फुले महाविद्यालयाने सुरू केलेल्या ‘मियावाकी’ तथा ‘आनंद घनवन’ या अभिनव अशा प्रकल्पाचीही पाहणी करून महाविद्यालयात सातत्याने चालू असणा-या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली बालाघाटाच्या पायथ्याशी खडकाळ जमिनीत नंदनवन फुलविण्याचे कार्य करण्याबरोबरच महाविद्यालयात विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. या अभिनव उपक्रमामुळे महात्मा फुले महाविद्यालयाची ओळख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात विशेष अशी आहे. गुणवत्तेबरोबरच सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक नीती मूल्यांची जोपासना करीत पर्यावरण संवर्धनाचे मोठे कार्य प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी हाती घेतले. या उपक्रमांची पाहणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केली आणि नुकतेच महाविद्यालयात सुरू करण्यात आलेला ‘मियावाकी’ अर्थात आनंद घनवन या प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे व सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
