सामाजिक उपक्रमातून निवृत्तीराव सांगवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार – सुस्मिता माने
उदगीर (एल. पी. उगिले) : राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष, तीन वेळा उदगीर नगरपालिकेचे नियोजन व विकास सभापती राहिलेले निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांचा वाढदिवस 12 सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडीच्या लातूर जिल्हा अध्यक्ष सुस्मिता माने यांनी दिली आहे.
आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणारे समाजातील गोरगरीब, गरजू नागरिकांना सर्वतोपरी मदतीचा हात देणारे लोकप्रिय नेते निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांचा वाढदिवस सर्वसामान्य माणसांच्या प्रेमातून साजरा होणार आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी हार तुर्यापेक्षा समाजातील गोरगरिबांना सहकार्य करावे. असा संदेशही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिला आहे.
सभा, संमेलना पेक्षा त्याऐवजी कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे. समाजाच्या हिताचा विचार करून भावी पिढीच्या विकासासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, वृक्ष संवर्धनही कसे करता येईल? या दृष्टीनेही विचार करणे गरजेचे आहे. यासाठीही कार्यकर्त्यांनी नियोजन करावे. असाही संदेश सुस्मिता माने यांनी दिला आहे.
यासोबतच आपल्या नेत्याला आरोग्य संपन्न उदंड दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रथमतः दर्ग्याला चादर अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णांना फळे वाटप करण्यात येतील. तसेच समाजामध्ये उपेक्षित जीवन जगणारे बेघर, निवारा नसलेल्या लोकांसाठी रोटी कपडा बँकेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अन्नदानाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गोरगरिबांनाही या निमित्ताने मिष्टान्न देऊन या आनंद उत्सवात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
यासोबतच नेत्ररोग व रक्तदाब, शुगर यांची मोफत तपासणी करण्यासाठी सिद्धार्थनगर येथे आरोग्य शिबिराचेही नियोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
सामान्यतः गोरगरीब, कष्टकरी नागरीक आपल्या आरोग्याकडे फारशा गांभीर्याने पाहत नाहीत. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी ठेवलेल्या विविध तपासणीच्या फीस त्यांना परवडत नाहीत, याची जाण ठेवून मोफत आरोग्य शिबिर ठेवण्याचा निर्धारही राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने व एम आय एम यांच्या सहयोगाने ठेवण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी सुश्मिता माने यांनी दिली आहे.
आज पर्यंत समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी आपले आयुष्य वेचणारे लोकनेते म्हणून ज्यांच्याकडे मोठ्या आशेने दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक, शोषित, उपेक्षित लोक पाहतात. अशा सामाजिक जाणीव जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातूनच साजरा केला जावा. या उद्देशाने विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुस्मिता माने यांनी दिली आहे.
