वीज अपघात टाळण्याचे महावितरणचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी) : सध्या पावसाळा आणि त्यात सणासुदीचे दिवस अधिक आहेत. बऱ्याच ठिकाणी केवळ चुकीच्या वीज वापरांमुळे वीज अपघात होत असल्याचे दिसून येते. अशा संदर्भाने परिमंडलात कुठेही वीज अपघात होवून त्यात कुणाची जिवित किंवा वित्तहानी होऊ नये. त्यासाठी नागरिकांनी विजेचा सुरक्षित आणि अधिकृत वापर करुन वीज अपघात टाळावेत, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
परिसरात बरेचशे वीज अपघात हे मानवी चुकांमुळे होतात, ते टाळण्यासाठी विजेचा अनधिकृत वापर टाळावा, विदयुत तारेवर आकडे टाकणे, घराच्या छतावर किंवा अंगणात कपडे वाळत घालण्यासाठी विदयुत वाहक रोपचा वापर करणे, शेतशिवारात जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेच्या कुंपनात विजेचा प्रवाह सोडण्याचे प्रकार कटाक्षाने टाळावेत. तसेच घरात किंवा उदयोग, व्यवसायाच्या ठिकाणी विजेची संच मांडणी अधिकृत विदयुत ठेकेदाराकडूनच करुन घ्यावी. त्यासाठी आयएसआय प्रमाणीत विदयुत साहित्याचा वापर करावा. अर्थिंगची योग्य व्यवस्था करावी. जूनी विदयुत संच मांडणी बदलून घ्यावी. पावसाने भिंती ओल्या झाल्या असतील तर त्यात विदयुत प्रवाह होणार नाही, याची काळजी घ्यावी. जोड दिलेले वायर्स वापरणे टाळावे किंवा त्याचे योग्यरितीने टेपींग करण्यात यावे. नियमानुसार ग्राहकांच्या घराच्या आतील (हाऊस प्रिमायसेस) भागात होणाऱ्या दुर्घटनेची जबाबदारी कुण्याही विदयुत वितरण यंत्रणेची नसलीतरी ग्राहक सुरक्षा ही महावितरणसाठी महत्वाची आहे.
गावठाण भागात किंवा इतरत्र कुठेही विजेच्या तारा तुटल्या असतील, विदयुत खांब तुटले असतील किंवा वीज यंत्रणा नादुरुस्त झाली असेल तर आहे. त्याबाबतची माहिती नागरिकांनी संबंधित अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी किंवा सहायक अभियंता यांना कळवावी. सोबतच लातूर जिल्हयातील नागरिकांनी त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षातील ७८७५७६२०२१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, पावसाळयात वादळी वारा आणि पावसामुळे किंवा अन्य काही कारणामुळेही वीज अपघातास पुरक स्थिती निर्माण होते. वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या तारांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, धोकादायक रोहित्रांचे बॉक्स दारबंद करण्यात यावेत, गर्दीच्या ठिकाणची वीज यंत्रणा निटनेटकी करण्यात यावी, वीज अपघात स्थळे शोधून त्यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात. याबदलही मुख्य अभियंता श्री. लटपटे यांनी महावितरण अभियंते आणि कर्मचाऱ्यांना निर्देशित केले.