उदगीर तालुक्यात फक्त 72 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जिल्ह्यात सर्वात कमी आकडा उदगीरचा !
उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना गोगलगाय मुळे सोयाबीनचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे नाट्य करून नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र दुर्दैवाने उदगीर तालुक्यात फक्त 72 शेतकऱ्यांना सात लाख वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे, तर सर्वात जास्त औसा तालुक्यात 47 हजार 251 शेतकऱ्यांना 51 कोटी 17 लाख रुपये मदत मिळणार आहे. तसेच रेणापूर तालुक्यात तीन हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांना तीन कोटी चाळीस लाख रुपये, निलंगा तालुक्यासाठी 35 हजार 400 शेतकऱ्यांना 34 कोटी 31 लाख रुपये, शिरूर आनंदपाल तालुक्यासाठी 770 शेतकऱ्यांना 66 लाख 76 हजार, देवणी तालुक्यासाठी 5342 शेतकऱ्यांना दोन कोटी शहात्तर लाख, चाकूर तालुक्यासाठी 253 शेतकऱ्यांना 21 लाख 76 हजार, लातूर तालुक्यात २४९ शेतकऱ्यांना 43 लाख 79 हजार इतकी मदत मिळणार आहे.
लातूर जिल्ह्यासाठी एकूण 93 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ते 92 हजार 652 शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र या सरकारने उदगीर तालुक्यावर मोठा अन्याय केला आहे. तालुक्यातून केवळ ७२च शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आता ही नोंद प्रशासनाने कशाच्या आधारे गेली? शेतकऱ्यांनी स्वतः नोंदी करण्याच्या सूचनेमध्ये सतत सर्वर डाऊन चा प्रश्न, शेतकऱ्यांचे यासंदर्भातले अज्ञान, हेही कारणीभूत असू शकते.
मात्र ग्रामसेवकांनी शेतीवर जाऊन त्या ठिकाणी त्या शेतीसोबत स्वतःचे फोटो पाठवावेत, आणि पंचनामे करावेत अशा पद्धतीच्या सूचना कृषी मंत्री सत्तार भाई यांनी दिल्या होत्या, असे असतानाही उदगीर तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
