उदगीरात गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन !
बीडीओनी दमदाटी करून बैठकीतून बाहेर काढून चुकीच्या पद्धतीने दोघांना निलंबित केल्याचा संघटनेचा आरोप
बीडीओ व ग्रामसेवक संघटनेचा १५ दिवसांपासून वाद सुरूच
ग्रामसेवक संघटनेची जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
उदगीर (प्रतिनिधी) : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी घरकुल योजनेच्या आढावा बैठकीतून ग्रामसेवकांना दमदाटी व अपमानित करून बाहेर काढले. चुकीच्या पद्धतीने ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्ष व सचिव अशा दोघांना निलंबित केले आहे असा आरोप करीत ग्रामसेवक संघटनेने जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून बुधवार ( दि. १४ ) पासून बीडीओंच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून उदगीरात बीडीओ व ग्रामसेवक संघटनेचा वाद सुरूच असल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तर्फे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी घरकुल योजनेबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीची कसल्याही प्रकारची पूर्व लेखी सूचना देण्यात आली नव्हती. बैठकीची सूचना वेळेत न मिळाल्याने , बैठकीचा उशिरा निरोप मिळाल्यामुळे अनेक ग्रामसेवक बैठकीस दहा मिनिटे उशिरा हजर झाले. गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी उशिरा हजर झालेल्या ग्रामसेवकांना बैठक हॉलमधून बाहेर काढत हॉलचे दार बंद करून घेतले. तेव्हा ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एन. ए. पटवारी व सचिव व्ही. एम. सोळुंके यांनी बैठक हॉलचे दार उघडून अर्ध्या तासापासून बाहेर थांबलेल्या २० ते २५ ग्रामसेवकांना बैठकीत बसू द्या अशी विनंती गट विकास अधिकारी यांच्याकडे केली. तेव्हा गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी संघटनेचे तालुकाध्यक्ष व सचिव यांना मोठ्या आवाजात तुमची ग्रामसेवक संघटना गॅझेटेड रजिस्टर आहे का ? तुम्ही काय कलेक्टर लागून गेलात का ? तुमच्या संघटनेच्या मागे किती ग्रामसेवक आहेत ? अशा भाषेत दमदाटी करून ग्रामसेवकांना बैठकीतून बाहेर काढल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने निवेदनात केला आहे. या घटनेनंतर ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी आमदार संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गटविकास अधिकारी यांच्या बाबत तक्रार केली. तेव्हा आमदार बनसोडे यांनी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यातील वाद स्थानिक पातळीवर उपजिल्हाधिकारी यांनी चर्चा करून मिटवावा असे सुचित केले. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एन. ए. पटवारी व सचिव व्ही. एम. सोळुंके यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
दरम्यान गेल्या १५ दिवसांपासून गटविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना यांच्यातील वाद सुरूच असून गटविकास अधिकारी यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेले ग्रामसेवक संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तर गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबन करण्यापूर्वी कसल्याही प्रकारची नोटीस न देता हेतूपरस्पर , जाणीवपूर्वक , सूड भावनेने संघटना मोडीत काढण्याच्या उद्देशाने संघटनेचे तालुकाध्यक्ष व सचिव यांना तात्काळ निलंबित केले आहे असा आरोप उदगीर शाखेच्या ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी , चुकीच्या पद्धतीने निलंबन करणाऱ्या गटविकास अधिकारी यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाभरातील ग्रामसेवक निलंबन मागे घेईपर्यंत असहकार आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू ठेवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिनांक १४ सप्टेंबर पासून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. असहकार आंदोलनात gram Sevak ग्रामपंचायत स्तरावर काम करतील. परंतु पंचायत समिती , जिल्हा परिषद यांनी बोलावलेल्या कोणत्याही बैठकीवर बहिष्कार असेल. असहकार आंदोलन काळात ग्रामपंचायत अभिलेखे तपासणी दाखवणार नाहीत , जिल्हा परिषद / पंचायत समिती कार्यालयास कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर करणार नाहीत. दिनांक २५ सप्टेंबर पर्यंत असहकार आंदोलन सुरू राहील. दिनांक १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ग्रामसेवक युनियनकडून धरणे आंदोलन करण्यात येईल , दिनांक २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल आणि दिनांक २६ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
