कासारशिरशी येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय स्थापन करावे – संतोष सोमवंशी
लातूर : औसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील गावासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेगळे उपविभागीय कार्यालय कासारशिरसी येथे स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे औसा विधानसभा मतदार संघातील निलंगा तालुक्यातील गावांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता कार्यालय निलिंगा येथे असताना आ.अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या जवळ आपले राजकीय वजन वापरत 68 गावाचा कारभार औसा आणि लातूर कार्यालयाशी जोडून घेतला आहे. तसा कार्यालयीन आदेश दि.13 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. मुळता हे सर्व गावे निलंगा शहरापासून अगदी जवळपास असल्याने येथील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी निलंगा येथे येजा करणे सोपे असतानाही नागरिकांच्या भावनेचा आदर न करता कार्यालय हलविन्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या गावातील नागरिकांना जवळ असलेले निलंगा सोडून आता लातूर ला जावे लागणार यापेक्षा कासारशिरशी येथे औसा विधानसभेतील या गावासाठी नवीन उपविभागीय कार्यालय स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी निवेदना द्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.