बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता हेच भारतीय समाजाचे बलस्थान – डॉ. मनोहर भंडारे
अहमदपूर (गोविंद काळे) : विविधेत एकता हीच प्राचीन काळापासून भारताची ओळख असून बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता हेच भारतीय समाजाचे बलस्थान आहे. असे, प्रतिपादन भाषातज्ज्ञ डॉ. मनोहर भंडारे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हिंदी दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भंडारे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. भंडारे म्हणाले की, जगाबरोबरच भारतातील अनेक भाषा नष्ट होत असून, भाषा ही एकटी नसते तर भाषेबरोबरच संस्कृती ही असते. म्हणून भाषांबरोबर अनेक संस्कृती ही नष्ट होत आहेत. हे अतिशय धोक्याचे असून प्रत्येकाने आपली मातृभाषा जपावी आणि प्रत्येकाने सर्व भारतीय भाषांचा अभिमान बाळगावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करतांना महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भाषा हा राष्ट्राचा प्राण असून हिंदी सारखी भाषा ही सर्व दूर पसरलेल्या भारतीय जनतेला एका सूत्रात बांधण्याचे ऐतिहासिक काम करते. म्हणून ही भाषा जपली पाहिजे. इंग्रजी पेक्षा मराठी आणि हिंदीला प्राधान्य दिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांनी केले. यावेळी हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “प्रयास” या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.