शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या सहयोगातून शिक्षण प्रक्रिया सुकर होते – प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड
दयानंद कला महाविद्यालयात पालक – विद्यार्थी – शिक्षक संवाद कार्यक्रम संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना अत्यंत सकारात्मक दृष्टीने सामोरे जाता यावे यासाठी दयानंद कला महाविद्यालयात ‘पालक-विद्यार्थी-शिक्षक संवाद बैठक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात कोविड 19 च्या नियमांचे पालन करून दररोज 20 विद्यार्थी व 20 पालकांना बोलावून संवाद बैठक घेण्यात आली. या संवाद बैठकीचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
या बैठकीला संबोधित करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की,” शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्या सहयोगातून शिक्षण प्रक्रिया सुकर होते. विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जावे,विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व मानसिक धैर्य देण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था व दयानंद कला महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांच्या सोबत असणार आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा आलेख उंचवावा.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी पालक व शिक्षक संवाद बैठकीचे संयोजक डॉ.संदीपान जगदाळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी महाविद्यालयात होत असलेल्या विविध परीक्षा व उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अन्य अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक शिक्षकांना 21 विद्यार्थ्यांचे पालकत्व देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे यांनी दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पारितोषिक व गुणवत्ता विकास उपक्रमांची सविस्तर माहिती सांगितली. बोर्ड परीक्षेत राज्य,विभाग व महाविद्यालयात सर्वप्रथम येणाऱ्या व अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्था, प्राचार्य, प्राध्यापक यांच्यावतीने हजारो रुपयांची पारितोषिके देण्यात येत असतात अशी माहिती त्यांनी सांगितली. या संवाद बैठकीत पालक व विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे व मोकळेपणाने चर्चेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. महेश जंगापल्ले यांनी केले.या संवाद कार्यक्रमासाठी प्रा. सुधीर गाढवे, प्रा शैलजा दामरे यांच्या समवेत पालक, विद्यार्थी उपस्थित होते.