अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय अंतरशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करून या निमित्ताने आलेले शोधनिबंध ग्रंथरूपाने प्रकाशित केले जाणार आल्याची माहिती प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी दिली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. ८ मार्च २०२१ रोजी ‘जागतिक महिला दिना ‘ चे औचित्य साधून ‘महिला सक्षमीकरण- वास्तव, भविष्यकालीन स्थिती आणि भावी वाटचाल ‘ या विषयावर आंतरशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये खालील विषयाच्या अनुषंगाने विविध सत्रात चर्चा होणार असून त्यासाठी पुढील उपविषय ठेवण्यात आले असून ‘महिला सक्षमीकरणाचे आजच्या अर्थकारणा वरील परिणाम, उद्योगक्षेत्राची महिला सक्षमीकरणातील भूमिका, महिला सक्षमीकरण व लिंगभावाधारित अर्थसंकल्प, महिला सक्षमीकरण व बदलते समाजकारण, महिला सक्षमीकरण व साहित्यात उमटलेले प्रतिबिंब, महिला सक्षमीकरण व भारतीय कायदे, क्रीडा क्षेत्रातील महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणात सांकृतिक क्षेत्रातील योगदान, माध्यमे व महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी : विशेष संदर्भ जिजाऊ ते सावित्रीबाईं फूले, महिला सक्षमीकरण व ‘कोविड – १९,’ महिला सक्षमीकरण सामाजिक चळवळीच्या संदर्भातून व महिला सक्षमीकरणात विविध योजनाचे योगदान हे उपविषय ठेवण्यात आले आहेत .
आपले शोधनिबंध वरिल विषयावर इंग्रजी, मराठी, हिंदी व संस्कृत या पैकी एका भाषेत दि. ३ मार्च २०२१, पर्यंत पाठवावेत. आपले शोधनिबंध जर्नल मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. तरी आपले शोधनिबंध वेळेत पाठविण्याचे अवाहन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व आयोजन समितीने केले आहे.