अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कायदा व सुव्यवस्थेबाबत शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील उर्दू माध्यमाची शाळा अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शेख रेहान या दहावीच्या विद्यार्थ्याने पवित्र कुरआन पठणाने केली. उपस्थित पाहुणे गोरख दिवेजी व शेख अझरोद्दीन यांचा सत्कार संस्थेचे सचिव शेख मोहम्मद अकबर साहेब व प्राचार्य शेख मुन्तजीबोद्दीन यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव शेख मोहम्मद अकबर यांनी ‘अल-अमीन एज्युकेशनल सोसायटी’ या संस्थेचा परिचय करून दिला. शाळा स्थापन करण्याचा उद्देश समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, तद्वतच विद्यार्थ्यांत नैतिक मूल्य व नैतिकता रुजावी. हा असल्याचेही स्पष्ट केले.
त्यानंतर उदगीर शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी आपल्या मार्गदर्शनात, विद्यार्थ्यांना आपल्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. आई-वडील, गुरुजन व मोठ्यांचा आदर करावा. अभ्यासाकडे लक्ष द्यावे. गुटखा, पान, सुपारी, सिगारेट यासारख्या स्वास्थ्याला हानिकारक वस्तूपासून नेहमी दूर राहावे. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घ्यावे. ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवू नये. कायद्याचे पालन करावे. समाजात शांतता व सुव्यवस्था स्थापित करण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही केले.
आजच्या काळात चोरट्यांनी आपली चोरीची पद्धत बदलली आहे. सायबर गुन्हे वाढत आहेत. मोबाईलचा सांभाळून वापर करावा. शक्यतो कमीत कमी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. दिवे यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोमीन यांनी केले. मोठ्या संख्येने शाळेतील पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते.