फटाके स्टॉलसाठी नगर पंचायतीने सार्वजनिक ठिकाणी नाहरात परवाने देऊ नयेत – मागणी
देवणी (एल.पी.उगीले) : आगामी होऊ घातलेल्या दिवाळी सणासाठी शहरात जेथे लोकांची वर्दळ असते, अश्या नगरपंचायतीच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून फटाके विक्रीचा परवाना नसलेले अनधिकृत फटाके स्टॉल लावून अनधिकृत विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. या फटक्याच्या दुकाना संदर्भात काही अनुचित प्रकार घडला तर मनुष्य हानी होण्याची दाट शक्यता आहे. देवणी शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा मुख्य रस्त्याच्या कडेला व लोक मोठ्या प्रमाणात ये – जा करणाऱ्या ठिकाणी नगर पंचायतीने नाहरकत परवाने देण्यात येऊ नयेत. अशी मागणी पत्रकार गिरीधर गायकवाड यांनी देवणीचे मुख्यधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, देवणी शहरातील काही फटाके विक्री करणारे व्यापारी दीपावलीच्या कार्यकाळात फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. त्यासाठी फटाके विक्रीसाठी प्रशासनाकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो. आज तागायत देवणी शहरात एकही फटाके विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे अधिकृत परवाना घेतला गेला नाही.
नगर पंचायतील काही लोकांना हाताशी धरून जागेचा नाहरकत परवाना घेऊन नगरपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून, रस्त्याच्या दुतर्फा बाजूने आपली अनधिकृत फटाके स्टॉल लावून सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत.न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 152/2015 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार फटाके दुकान निवासी अथवा तळघरात ,सार्वजनिक लोकवस्तीत असणार नाहीत, जेथे खुली जागा उपलब्ध आहे. तेथे फटका दुकान असावे,असे नमूद बाबीबाबत स्वयंघोषणा पत्र सादर करावे,भारतीय राज्य घटनेतील विस्फोटक नियम 2008 नियम 84, 85 ,86 मध्ये नियमानुसार कार्यवाही करण्यात येते.
या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नियमानुसार नगर पंचायतीला ना हरकत परवाना देता येत नाही, परंतु आजपर्यंत त्यांना शहरात नाहरकत परवाना दिला असल्याने या व्यवसायायिकाचे मनोबल वाढले आहे. एखाद्या फटाके विक्रत्याकडे शासकीय नियमानुसार परवाना असेल व तो नियमित नूतनीकरण करून घेतला असेल तर त्यांना गावच्या बाहेर रिकाम्या जागेत, संबंधित जागेचा रीतसर पंचनामा करून त्यांना ना हरकत परवाना देण्यात यावा. अशी मागणी पत्रकार गिरीधर गायकवाड यांनी केली आहे.