शहरातील बुद्ध विहार आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणार : आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळेच आपल्याला उदगीर, जळकोट मतदार संघाचा आमदार व मंत्री म्हणून काम करता आले. त्यातच माझ्या समाज बांधवांचा मोठा वाटा आहे. याची मला जाणीव असून येत्या काळात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवुन त्याचे सुशोभीकरण लवकरच करू व शहरात नव्याने होत असलेल्या तळवेस येथील बौद्ध विहार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभा शाखा उदगीरच्या वतीने 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त आयोजित भव्य मोटरसायकल रॅली व पदयात्रे प्रसंगी बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूरखाँ पठाण,
माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, महेबूब शेख, श्रीकांत पाटील, मनोहर कांबळे,
रिपाईचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे एस. डी. कांबळे, विद्यासागर डोरनाळीकर, मच्छिंद्र बलांडे, भीमशक्तीचे शिवकुमार कांबळे, जितेंद्र शिंदे, संघशक्ती बलांडे, भीम शौर्य युवा मंच सुशील कुमार शिंदे, अविनाश गायकवाड, सतीश कांबळे, सिद्धार्थ शिंदे, कमलाकर सांगवीकर, नरसिंग कांबळे, नितीन गायकवाड ,अतुल घोडके, अनुसयाबाई कांबळे, कांताबाई वाघमारे, सौ. वाघमारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी येत्या काळात आपण सर्वांनी विकासाच्या मागे खंबीरपणे उभे राहून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे हात बळकट करावे. विरोधक विरोधाला विरोध म्हणून जातीपातीचे राजकारण करू पाहत आहेत, आपण सर्वजण सुज्ञ व जागरूक आहात. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन आपण सोबत राहावे, असे आवाहन केले.
शहरात नव्याने होत असलेल्या तळवेस येथील बौद्ध विहाराचे काम चालु आहे. या बौद्ध विहारास आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप आणुन समाजात नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम मी करणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. विहारा जवळच नवबौध्द घटकांसाठी अभ्यासिका केंद्र बांधण्यात आले असून येत्या काळात आपल्यातीलच काही तरुण बांधव अधिकारी होऊन मोठ्या पदावर जावेत, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून उपस्थित समाज बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी समता सैनिक दल व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.