अडगळीला पडलेले साहित्य गरजूंच्या उपयोगाला यावे – डॉ.लखोटिया
उदगीर (एल. पी. उगीले) : समाजातील कित्येक श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक आपल्या उपयोगाच्या नंतर बरेच सामान अडगळीला टाकतात. वास्तविक पाहता ते पूर्णपणे टाकाऊ किंवा निरुपयोगी नसतात. त्याचा वापर गोरगरिबांना करता येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर लायन्स क्लब उदगीर उमंग आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या पुढाकारातून “दान उत्सव” सुरू करण्यात आला आहे.
अशी माहिती उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी दिली आहे.
दान उत्सवाची सुरुवात सध्या वातावरणातील बदल लक्षात घेऊन गोरगरिबांना उबदार कपड्यांची गरज जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपात काही उपदार वस्त्र व इतर जीवन आवश्यक उपयोगी वस्तू उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय येथे डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संकलित केले.त्या नंतर गरजूंना वाटप करण्यात आल्या. यावेळी या संकल्पनेची गरज व महत्त्वही समाजसेवक डॉ. लखोटिया यांनी पटवून सांगितले.
बऱ्याच वस्तू आपल्या वापरात नसलेल्या किंवा त्या वस्तू वापरणे योग्य नाही. म्हणून आडगळीला टाकून ठेवलेल्या त्या वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांनी दान म्हणून ह्या चळवळीला दिल्या तर एखाद्या गोरगरीब गरजू लोकांची गरज भागू शकते. त्यांना मदत होऊ शकते. त्यासोबतच मदत करण्याची भारतीय संस्कृती विकसित होऊ शकते. या संस्कृतीला आपण जपूया, आणि आपल्या समाजातील गरजू गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी आपल्या अडगळीचे सामान त्यांना देऊयात. या चळवळीला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन याप्रसंगी संयोजक या नात्याने डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे.
उबदार वस्त्र तसेच इतर साहित्य दान करून यामध्ये प्रामुख्याने आपल्या घरी वापरत नसलेल्या जुन्या साड्या, पुस्तके, चपला, अन्नपदार्थ, वापरात नसलेली लहान मुलांची खेळणी, नंबर बदलल्यामुळे वापरात नसलेले चष्मे, काही कारणांनी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी डोस बदलल्यामुळे न वापरलेले औषध, गोळ्या या आपण आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या. लायन्स परिवाराच्या वतीने सर्व लॉयन्सचे समाजसेवक या कामासाठी सहकार्य करत आहेत. आपणही हातभार लावावा. असेही आवाहन डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे.
