सलग तीन तास वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे चिमुकल्यांनी सलग तीन तास वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला. सर्वप्रथम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.15 ऑक्टोबर मिसाईलमॅन भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते. इयत्ता सातवी ब च्या वर्गात जून पासून वर्ग वाचनालय हा उपक्रम चालतो. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी 70 पुस्तके वाढदिवसानिमित्त जमवली आहेत. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सलग तीन तास वाचन करून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा केला.वर्गशिक्षिका नीता मोरे यांच्या संकल्पनेतून गोष्टीची पुस्तके, विज्ञान कथा, रंजक कथा, भारताचे स्वातंत्र्यसमर, 60 महामानव, गणिती कोडे, अशा विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश या वर्गवाचनालयात आहेत.याचे विद्यार्थ्यांनी वाचन केले.
मार्गदर्शन करताना विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड म्हणाले, वाचनाने माणूस खूप ज्ञानी बनतो. विविध क्षेत्रातील माहिती मिळवतो. व तो अपडेट राहतो. म्हणून सातत्याने वाचन करायला हवे.लालासाहेब गुळभिले यांनी उपक्रम सत्य असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर माधव मठवाले यांनी इतर वर्ग नक्कीच या उपक्रमातून प्रेरणा घेतील, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. वर्गशिक्षिका नीता मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
