राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल च्या वतीने महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना नागरी समस्यांचे निवेदन
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल, आयटी सेल लातूर शहरच्या वतीने विविध नागरी समस्यांसंबंधी निवेदन देण्यात आले.
प्रभारी आयुक्त पृथ्वीराज यांच्या उपस्थितीत शहरातील क्षेत्रिय कार्यालय (क) येथे रविवारी सकाळी जनसुनावणी घेण्यात आली. यामध्ये अमृत पुरवठा योजनेसाठी खोदलेले रस्ते ताबडतोब दुरुस्त करणे, लोकांच्या घरावरून एमएसईबीची हाय व्होल्टेज विद्युत लाईन हटविणे, उटगेनगर – गोरक्षण – मंठाळेनगर कॉर्नर व डाल्डा फॅक्टरी विहिरी जवळील कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावून उपाययोजना करणे, नवीन कोल्हेनगर येथे कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा उच्च दाबाने करणे, संत गाडगेबाबा महाराज चौक परिसर स्वच्छ ठेवणे, स्क्रॅप मार्केट रोड ते रिंग रोडपर्यंत रोडवरील खड्ड्यांत मुरूम टाकणे, वाहतुकीचे व्यवस्थापन करणे तसेच प्रशासकीय भूसंपादनाच्या लालफितीत अडकलेला श्रीकृष्णनगर ते सम्राट चौकाला जोडणारा रोडबाबत सकारात्मक विचार मंजूर करणे, कोल्हेनगर परिसरातील गटारीवर क्रासिंग करणे यासारख्या अनेक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अर्बन सेल व राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डी. उमाकांत, जितेंद्र गायकवाड, आगवाने, पाटील आदी उपस्थित होते.
