साहित्य हे संस्काराची शिदोरी आहे – डॉ.अर्चना मोरे
उदगीर (एल.पी.उगीले) : वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देते. भित्तिपत्रकासारख्या माध्यमातून विद्यार्थी आपले लेखण करतात. यातूनच नवीन लेखक उदयास येत असतात. साहित्य आपल्याला योग्य दिशा देते .साहित्य हे संस्काराची शिदोरी आहे असे वक्तव्य महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील मराठी विभागातील डॉ. अर्चना मोरे यांनी काढले. त्या शिवाजी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एल एच पाटील हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार ,मराठी विभाग प्रमुख डॉ सुरेश शिंदे ,डॉ.कदम नरसिंग यांची होती.पुढे बोलताना डॉ मोरे म्हणाल्या साहित्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, जात्यावरच्या ओव्या, भारुडे, लावण्या ,लोकगीत, लोककथा आदी साहित्याने आपल्या संस्कृतीचे जतन केले. संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवून दिले . त्यामुळेच साहित्य समृद्ध होत गेले असे विचार मांडत असताना त्यांनी अनेक संतांचे अभंग, कवींच्या कविता, विचारवंताचे दाखले दिले .यावेळी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. वाङ्मय मंडळ पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ पाटील म्हणाले साहित्याची सांगड व्यवहाराशी घालण्याची आवश्यकता आहे. साहित्य आणि सहकार यांचा विचार एकत्रितरित्या केल्यानंतर नक्कीच साहित्य आपले वेगळेपण सिद्ध करेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ सुरेश शिंदे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन एस केंद्रे यांनी तर आभार डॉ नरसिंग कदम यांनी मानले. कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉ. व्ही के भालेराव,प्रा. बालाजी सूर्यवंशी,डॉ. प्रणिता पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
