कै. पी. जी. पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय – डॉ. अनिल मुंढे

कै. पी. जी. पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय - डॉ. अनिल मुंढे

अहमदपूर ( गोविंद काळे) : शिक्षण हेच बहुजनांच्या मुक्तीचे एकमेव माध्यम असून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे समाजाला पटवून देत शिक्षण महर्षी कै. पी.जी. पाटील यांनी मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय असे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन ह.भ.प.डाॅ. अनिल मुंढे यांनी केले.

डॉ.मुंढे हे येथील महात्मा फुले महाविद्यालयात शिक्षण महर्षी कै. पी. जी. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. अनिल मुंढे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर विचारपीठावर लातूर येथील युपीएससी मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. अमृत कुमार सिंग, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ. सचिन गर्जे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. अनिल मुंढे म्हणाले की, कै. पी.जी. पाटील यांनी त्याग आणि समर्पणाच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रात किसान शिक्षण प्रसारक मंडळाचा नैतिक दबदबा निर्माण केला होता. पंचवीस वर्षे मंडळाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी मंडळाच्या शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांचा प्रचंड वेगाने विस्तार केला असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात अनेक शिक्षण संस्था असल्या तरी किसान शिक्षण प्रसारक मंडळा सारख्या गुणवत्ता युक्त दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था बोटावर मोजता येतील एवढ्याच असून, किसान शिक्षण प्रसारक मंडळाने कै. पी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने ‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘ या ब्रीदाला साजेशी कामगिरी केली आहे. गोरगरीब, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वाभिमानी बनावे हेच कै. पी.जी. पाटील यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर माने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजीत मोरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author