केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विश्लेषणात्मक अभ्यासाची गरज – अमृत कुमार सिंग

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विश्लेषणात्मक अभ्यासाची गरज - अमृत कुमार सिंग

अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये पूर्ण आत्मविश्वास आणि विश्लेषणात्मक अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन लातूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ ब्युरोक्रॅटिक एक्झामिनेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक अमृत कुमार सिंग यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, संयोजक डॉ. सचिन गर्जे, डॉ. अनिल मुंढे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अमृत कुमार सिंग म्हणाले की, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे. पदवी शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पाहिजे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, विद्यार्थीवर्गाने युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा का द्याव्यात हे सांगताना ते म्हणाले की स्पर्धा परीक्षा हा करिअरचा राजमार्ग आहे.यात यशस्वी झाले की, पद आणि प्रतिष्ठा मिळते. त्यातून जनसामान्यांची कामे करता येतात. शिवाय एकदा पद मिळाले की ते रिटायरमेंट पर्यंत राहते. प्रमोशनने उच्च पदावरही पोहचता येते, त्यासाठी जिद्दीने परिश्रम करण्याची तयारी असणे आवश्यक असते असेही ते म्हणाले यावेळी समाजशास्त्र, अर्थ शास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व भूगोल तसेच क्रीडा विभागाच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. सचिन गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर माने यांनी केले ; तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजीत मोरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author