शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी हे मुन्ना पाटलांच्या लोककल्याणकारी कार्याची पावती देणार – आ. अमित देशमुख

शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी हे मुन्ना पाटलांच्या लोककल्याणकारी कार्याची पावती देणार - आ. अमित देशमुख

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी या सर्वांच्या हिताचा विचार करून लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या आहेत. या लोककल्याणकारी योजना राबवल्यामुळे त्यांच्या कार्याची पावती म्हणून सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले. गोरगरीब हमाल, मापाडींच्या भावी जीवनाचा विचार करून पूर्वी तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांनी हमाल, मापाडी, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी विमा योजना चालू केली होती. त्याचाही अनेक गरिबांना लाभ झाला. अशाच लोक कल्याणकारी योजना याही वेळी मुन्ना पाटील यांनी प्रस्तावित ठेवल्या आहेत.

तसेच पशुधनाची काळजी करत पशुधनाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 50 हौद बांधले आहेत. पशुधन हे शेतकऱ्याचे दैवत आहे, किंबहुना त्याचे सर्व काम पशुधनावर अवलंबून असल्याने यदा कदाचित नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याची भूमिका देखील बाजार समितीने घेतली. ही उल्लेखनीय बाब आहे. वीज पडून जनावरे दगावली तर 21 हजार रुपये तसेच जर कोणी दुष्ट प्रवृत्तीने शेतकऱ्याची सोयाबीनची बनीम पेटवून दिली तर त्यासाठी पंचवीस हजार रुपये अर्थसाह्याची उल्लेखनीय योजना प्रत्यक्ष राबवली आहे.

शेतकऱ्याच्या घरी मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या नावाने निश्चित रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवून बालिका बचाव योजना बाजार समितीने सुरू केली होती. मात्र विरोधकांनी त्या योजनेवर आक्षेप घेऊन ती बंद पाडली. ती पुन्हा पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने मुन्ना पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. तसेच या बाजार समितीच्या अंतर्गत उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न कार्यक्रम असतील तर अत्यंत अल्प दरात मंगल कार्यालयाची सुविधा उपलब्ध केली जावी, यासाठी बाजार समितीच्या वतीने मंगल कार्यालय उभारण्यात येत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद आणि गौरव करावा अशी बाब आहे. यासोबतच शेतकरी दिवसभर उदगीर शहरात राहतो, रात्री उशिरा गावी जातो. कधी त्याच्याकडे डबा असतो, कधी नसतो. या गोष्टीचे गांभिर्य विचारात घेऊन केवळ पाच रुपयांमध्ये शेतकऱ्याला पोटभर जेवण देता येईल, अशी सुविधाही बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.

शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी हे मुन्ना पाटलांच्या लोककल्याणकारी कार्याची पावती देणार - आ. अमित देशमुख

अगोदरच्या काळात यार्डात सतत चिखल व्हायचा, त्यामुळे संपूर्ण मार्केट मध्ये दर्जेदार रस्ते तयार केले आहेत. 50 विद्युत पोलची उंची वाढवली आहे. 15 विद्युत पोल हाई मॅक्स उभा केलेले आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी जे जे गरजेचे आहे,ते ते करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. व्यापाऱ्याचे हित गांभीर्य विचारात घेऊन वादात असलेले 45 प्लॉटचे वाटपही करण्यात आलेले आहे.

कधीकाळी नुकसानीत असलेली ही बाजार समिती स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी नफ्यात आणली. दोन ते अडीच कोटी रुपये पूर्वी नफा होता. तो नफा आता सात ते आठ कोटीवर आणला आहे. त्यासोबतच शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी या सर्वांचा विश्वास संपादन करून सॅम्पलची पद्धत बंद केली आहे. अशा उल्लेखनीय लोककल्याणकारी योजना सोबतच मुन्ना पाटील यांनी सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या गोष्टी उदगीर तालुक्यातील जनता कदापी विसरणे शक्य नाही. त्यांच्या कार्याची पावती जनता निश्चित देईल, असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

ते उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या पाच हजार टन धान्य साठवणूक करता येईल, अशा गोदामाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हे होते, तर प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे,प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे नेते अभय साळुंखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक लक्ष्मीताई भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोटचे अध्यक्ष आगलावे, काँग्रेस पक्षाचे जळकोटचे नेते मनमत किडे, माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार, रमेश पाटील तपश्याळकर, संतोष बिरादार, पद्माकर उगिले, काँग्रेसच्या युवा नेत्या प्रीती चंद्रशेखर भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी केले. स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजेश्वर नीटुरे आणि काँग्रेसचे इतर नेते यांच्या सहकार्याने बाजार समितीची निवडणूक लढवली. आणि मोठ्या जिद्दीने जिंकली देखील! या गोष्टीचा राग मनात धरून भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार यांनी वेळोवेळी अनेक अडचणी आणल्या, वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भात आक्षेप घेतले. लोककल्याणकारी योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र गरज पडल्यास उच्च न्यायालयापर्यंत जाऊन लोककल्याणकारी योजना मंजूर करून आणल्याचे माहिती याप्रसंगी सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी दिली. तसेच उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती ही त्यांनी दिली.

पुढे बोलताना आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले की, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती ही लोकांसाठी काम करणारी राज्यातील उल्लेखनीय अशी बाजार समिती असून उत्पन्नाच्या बाबतीतही मराठवाड्यातील दुसरी बाजार समिती असल्यामुळेच या कृषी उत्पन्न बाजार समितीला उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राज्यातील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली नाही, मात्र त्याला उदगीर अपवाद ठरले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती लोककल्याणकारी योजना राबवत असून लोकांच्या हिताला प्राधान्य देत असल्यामुळे मुदतवाढ मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणातून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळून विधानसभा मतदारसंघांमध्ये उल्लेखनीय सहकार्य केल्याचा आवर्जून उल्लेख केला. इतकेच नाही तर मुन्ना पाटील नसते तर आपण आमदारही राहिलो नसतो. या भाषेत त्यांनी मुन्ना पाटलांनी निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या कार्याचा गौरव केला. उदगीरच्या जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून आपण विकास कामे केली आहेत. त्यात आमदार अमित देशमुख यांचेही सहकार्य मोठे आहे, असे सांगितले. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर महाविकास आघाडीला ताकद दिली पाहिजे.तरच उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आणखी प्रगती करता येईल. त्यासाठी आपल्या परीने जे जे शक्य असेल ते ते सहकार्य आपण करू. पद हे लोककल्याणाची कामे करण्यासाठी असते, ते शोभेसाठी नाही. याची जाण मला आहे, असेही सांगितले.

याप्रसंगी उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील यांचेही समायोजित भाषण झाले. अध्यक्ष समारोपातून राजेश्वर निटूरे यांनी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे आणि स्वर्गीय चंद्रशेखर भोसले साहेबांचे स्वप्न साकार करते आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. गेल्या दहा ते बारा वर्षात जो विकासाचा बॅकलॉग होता, तो फक्त अडीच वर्षात आमदार संजय बनसोडे यांनी भरून काढला आहे. अत्यंत गतीने उदगीरचा विकास त्यांनी केला आहे, आणि अजूनही ते करतच आहेत. याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवनाळे यांनी तर आभार प्रदर्शन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भगवानराव पाटील यांनी केले.

About The Author