दयानंद कला महाविद्यालयात दिपसंध्या संगीतोत्सव कार्यक्रम संपन्न

दयानंद कला महाविद्यालयात दिपसंध्या संगीतोत्सव कार्यक्रम संपन्न

गायन, वादन व नृत्याच्या आतिषबाजीने उजळून निघाला दीपसंध्या संगीतोत्सव

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय आय. क्यू. ए. सी विभाग व संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २४/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात दीपसंध्या संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आधिराज जगदाळे यांनी सादर केलेल्या ‘सूर निरागस हो’ या गणेश स्तुतीने झाली. त्यानंतर तेजस धुमाळ यांनी अत्यंत तयारीने व कल्पकतेने ताल तीनतालमध्ये स्वतंत्र तबलावादन केले.ज्यात पेशकर, कायदे, रेले, स्तुती, तुकडे आदी बंदिशी सादर करून श्रोत्यांना रोमांचित केले.त्यांना हार्मोनियमवर लहरासाथ प्रा.एकनाथ पांचाळ यांनी केली. युवक महोत्सवात शास्त्रीय गायनात सुवर्णपदक प्राप्त केलेली उदयोन्मुख गायिका कु. किशोरी मुर्के हिने ‘शुद्ध सारंग’ हा राग सादर करून मैफलीचा कळस चढविला. आलाप, ताना, बोलताना, सरगम आदी सादर करून तिने रसिकांना मंत्रमुग्ध केले. याच रागात अत्यंत तयारीने ‘तराणा’ हा गीत प्रकार सादर केला. त्यानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने सादर करून रसिकांना भक्तीरसात डुंबविले.तिला हार्मोनियमची साथसंगत प्रा. शरद पाडे यांनी केली तर तबल्याची साथ तेजस धुमाळ यांनी केली.

दयानंद कला महाविद्यालयात दिपसंध्या संगीतोत्सव कार्यक्रम संपन्न

युवक महोत्सव ‘नक्कल’ या कला प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या ज्योतिबा बडे याने विविध चित्रपट कलावंत व राजकीय नेत्यांची नक्कल करून दाद मिळविली.सुप्रसिद्ध नर्तिका स्नेहा शिंदे हिने ‘उंच माडी वरती चला’ ही लोकप्रिय लावणी आपल्या मोहक अदा व पदविण्यासाने सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. सुप्रसिद्ध गीतकार व गायक राजन सरवदे यांनी गोंधळ हा पारंपारिक लोककला प्रकार सादर करून मैफिलीचा चरमबिंदु गाठला. त्यांना ढोलकीची साथ सुप्रसिद्ध ढोलकी वादक सुरज साबळे यांनी केली.तर ऑटोपॅड वर ज्योतिबा टेकाळे तर सिंथेसायझरवर जोतिबा कांबळे यांनी साथसंगत केली. संगीतोत्सवाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, अधिक्षक रूपचंद कुरे उपस्थित होते. या संगीतोत्सवाचे सूत्रसंचालन हास्य कलावंत बालाजी सूळ यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागातील डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ.संदीपान जगदाळे, प्रा. सोमनाथ पवार, प्रा. सचिन पतंगे, प्रीतम मुळे, विकास खोगरे, शैलेश आदमाने यांनी परिश्रम घेतले.

About The Author