शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज – जकनाळकर

शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज - जकनाळकर

उदगीर (एल. पी. उगिले) : भावी पिढीला समृद्ध जीवन जगायचे असेल तर पर्यावरणाचा समतोल आणि हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात राहिले पाहिजे. यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. असे विचार उद्योजक रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी व्यक्त केले. ते जकनाळ या गावी वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काळ आणि वेळ कधी कसा येईल? हे सांगता येत नाही, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या संसर्गाने ज्या लोकांना त्याची लागण झाली त्या लोकांसाठी ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत होती. याचे एकमेव कारण म्हणजे समाजामध्ये होत असलेले मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि वृक्षारोपणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामाकडे होत असलेले दुर्लक्ष हेच आहे. असेही सांगितले.

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उदगीर तालुक्यातील जकनाळ येथे ग्रामपंचायतच्या वतीने व सर्व नागरिकांच्या पुढाकारातून गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करावे, ज्यामुळे शाश्वत विकासाला गती मिळेल. अशी कल्पना सरपंच सौ. बिरादार जकनाळकर यांनी ग्रामस्थ समोर मांडल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी ही कल्पना कृतीत आणण्यासाठी पुढाकार घेऊन वृक्षारोपण करून, आपले गाव नैसर्गिक समतोल निर्माण करणारे आणि निसर्गाचे सौंदर्य वाढवणारे ठरावे म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी युवा उद्योजक रामेश्वर बिराजदार जकणाळकर यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थां तर्फे वृक्षारोपणाचे कार्य केले. तसेच शासनाच्या वतीने येणाऱ्या विविध सूचना आणि गावच्या विकासाच्या संदर्भातील निर्णय प्रत्यक्ष कृतीत राबवण्याचे ठरविले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, आबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author