विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी विशेष रेल्वे कार्तिकी एकादशी निमित्त वारकऱ्याची सोय
उदगीर (एल.पी.उगीले) : कार्तिकी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेने 3 नोव्हेंबर 2022 रोजी बीदर – पंढरपूर विशेष रेल्वेची फेरी मंजूर केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रक काढून कर्नाटक व महाराष्ट्रातील वारकरी व भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या विनंतीवरून विशेष रेल्वे सोडणार असल्याचे सुचित केले.
बीदर येथून 3 नोव्हेंबर रोजी गाडी संख्या 07517 रात्री 10.30 वाजता पंढरपूरकडे गाडी रवाना होईल. रात्री 11.100 वाजता भालकी, 11.25 वाजता कमालनगर,11:45 वाजता उदगीर, 12.48 वाजता लातूर रोड व पुढे लातूर,उस्मानाबाद,कुर्डुवाडी मार्गे 4 नोव्हेंबरला सकाळी 7.00 वाजता पंढरपूर ही गाडी पोहचेल. परतीच्या प्रवासात 04 तारखेस रात्री गाडी संख्या 07518 ही गाडी रात्री 8:00 वाजता पंढरपूरहून सुटेल. कुर्डुवाडी, उस्मानाबाद,लातूर मार्गे पहाटे 2:45 ला उदगीरला येईल व पुढे कमालनगर, भालकी, मार्गे बीदरला पहाटे 5:00 ला पोहचेल.
महाराष्ट्र व सीमाभागातून भाविक कार्तिकी एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जात असतात. वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्याने सोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.