ॲड गौरव देशमुख वडियार यांचा श्री हावगीस्वामी महाविद्यालयात सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयास ॲड. गौरव राजेंद्र देशमुख वडियार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. ॲड गौरव राजेंद्र वडियार हे भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर यांचे नातू तर संस्थेच्या सदस्या डॉ.सौ मनीषाताई देशमुख वडियार यांचे सुपूत्र आहेत. ॲड. गौरव देशमुख वडियार यांनी लंडन येथील सुप्रसिद्ध किंज कॉलेज येथून आंतरराष्ट्रीय फायनान्शियल लॉ मध्ये एल.एल. एम. ही अतिशय मानाची पदवी संपादन केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर,संस्थेचे सचिव उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एस. एन. शिंदे,उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत धनुरे इत्यादींनी त्यांचा सत्कार करून गौरव तथा अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सचिव उमेश पाटील देवणीकर यांनी आपल्या मनोगतात गौरव वडियार यांनी लंडन येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करून त्यांनी विदेशातून घेतलेल्या पदवीचा फायदा आपल्या देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे , बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, पण ते परदेशास फायदा करून देतात, परंतु ॲड गौरवनी आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा आपल्या देशासाठी केला पाहिजे. अशी भावना व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस एन. शिंदे यांनी अभिनंदनपर मनोगतात म्हणाले,श्री हावगीस्वामी परिवाराला ॲड गौरव देशमुख वडियार यांचा सार्थ अभिमान आहे. आणि अशाच स्वरूपाची उच्च शिक्षणातून त्यांनी परिवाराचा नव्हे, तर देशाचाही गौरव करावा अशी भावना व्यक्त केली आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या सदस्य डॉ. सौ. मनीषाताई देशमुख वडियार यांनीही आपल्या भावना व्यक्त करत असताना गौरवचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत हे माझे वडील ॲड. गुणवंतराव पाटील आहेत. माझे वडील १९६० च्या दशकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशातल्या नामांकित उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून एल.एल.बी.चे शिक्षण घेऊन यशस्वी विधीज्ञ म्हणून कार्य केले आहे. त्यांचाच आदर्श घेऊन गौरव पुढे जातो आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ॲड. गौरव वडियार यांचा परिचय प्रा.मनोहर भालके यांनी करून दिला तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. अप्पाराव कळगापुरे यांनी मानले.