दयानंद कला महाविद्यालयात महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान

दयानंद कला महाविद्यालयात महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान

लातूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेष प्रसंगी दयानंद कला महाविद्यालयात सर्व महिला प्राध्यापकांचा व प्रशासकीय सेवेत असलेल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व महिलांना फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या कर्तुत्वाचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सर्व महिलांच्या वतीने प्रा.डॉ. सुनीता सांगोले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य सांगताना त्या म्हणाल्या, संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हाजागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.
आज आपण बऱ्यापैकी स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्याबरोबर जबाबदारीही वाढली आहे. आम्ही दयानंद शिक्षण संस्थेच्या कला महाविद्यालयात काम करतो येथे आम्हास अत्यंत सन्मानाची वागणूक मिळते. येथे काम करताना निर्भय सुरक्षित आणि अत्यंत आनंददायी अनुभव आम्हास येतो. असा आपला अनुभव सांगून त्यांनी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन आणि कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयातील ३४ महिला सहकारी व ६९ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यांना श्री गोविंद कांबळे यांनी फेटे बांधले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले. उपप्राचार्य अनिल माळी, डॉ. संदीप जगदाळे आणि सर्व महिला प्राध्यापिका व महिला कर्मचारी यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात महिला दिन साजरा झाला.

About The Author