तरुणांनी उद्योग धंद्याला प्राधान्य द्यावे – डॉ. तेलगाने
उदगीर (एल. पी. उगीले) : सध्या समाजामध्ये प्रत्येक तरुणाला नोकरी हवी अशी अपेक्षा असते. आपण शिक्षण घेतले तर आपल्याला योग्य नोकरी मिळावी, ही अपेक्षा असणे चुकीचे नाही. मात्र गेली दोन वर्ष कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यात अगोदरच नोकरीवर असलेल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
तशातच शासनाने नोकर भरतीवर अनेक क्षेत्रांमध्ये बंदी आणली आहे. त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचे उद्योग धंदे उभारावे, असे विचार राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रबोधनकार, कीर्तनकार उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी उद्धव गायकवाड यांच्या माऊली टेलर्स या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
स्वतःचा उद्योग व्यवसाय हा इतर कोणत्याही नोकरीपेक्षा हजार पटीने चांगला असतो. तसेच आपण जर आपल्या उद्योगधंद्यात प्रगती केली तर, आपल्याला इतरही दोन-चार लोकांना नोकरी देता येते. हा विचार डोक्यात ठेवून तरुणांनी श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देत आपापल्या योग्यतेप्रमाणे आणि कुशलते प्रमाणे उद्योग व्यवसाय सुरू करावेत. समाजातून त्यांना आपोआप प्रतिसाद मिळत जातो. असा विश्वासही डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी व्यक्त केला आहे.