भारत जोडो यात्रा एक परिवर्तनाची नांदी ठरेल – विजय निटुरे

भारत जोडो यात्रा एक परिवर्तनाची नांदी ठरेल - विजय निटुरे

उदगीर (एल. पी. उगिले) : काँग्रेसचे नेते युवकांचे हृदय सम्राट राहुलजी गांधी यांनी संपूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा अभियान चालू केले आहे. ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये जास्त प्रभावीपणे आणि उत्स्फूर्त युवकांच्या सहकार्याने यशस्वी करणे आपले कर्तव्य आहे. असे विचार लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केले.
ते भारत जोडो यात्रा, अभियान अंतर्गत येणाऱ्या यात्रेच्या संदर्भात युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
देशभरातून राहुलजी गांधी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर देशात परिवर्तनाची नांदी येणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज राहणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने जास्तीत जास्त युवकांना सोबत घेऊन भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. असे आवाहनही विजय राजेश्वर निटुरे यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख, आ. धीरज विलासराव देशमुख, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य दादा उटगे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वरजी निटुरे, अशोकदादा निलंगेकर, साळुंकेजी इत्यादी मान्यवर आपल्या सोबत असून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत.
वातावरणात होणारा बदल लक्षात घेता कोणतीही तमा न बाळगता युवा नेते राहुलजी गांधी यांनी खंबीरपणे भारत जोडो यात्रा सुरूच ठेवली आहे. देशातील एकता टिकण्यासाठी लढणाऱ्या या नेतृत्वाच्या सोबत राहण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळणार आहे. सद्यस्थितीत देशांमध्ये द्वेष, धार्मिकतेड मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे.
सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल होईल, इतकी महागाई, भ्रष्टाचार वाढलेला आहे. इंधनाची दरवाढ तर प्रचंड झाली आहे. या सर्वच गोष्टीला पर्याय म्हणून स्वाभिमानी प्रवृत्तीने राहुल गांधी यांना साथ द्यावी. आणि परिवर्तनाच्या नांदीचे साक्षीदार व्हावे. असेही आवाहन विजय राजेश्वर निटुरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये दिनांक 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या दरम्यान देगलूर, नायगाव, नांदेड, हिंगोली या भागात ही यात्रा राहणार असून हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी माजी पालकमंत्री आ. अमित भैया देशमुख यांच्यावर असल्याने प्रत्येक युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा. असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले आहे.

About The Author