महाराष्ट्र पोलिसांना सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सलमान नबीजी यांचा सत्कार
लातूर (एल.पी.उगीले) : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत जुदो क्लस्टर या खेळ प्रकारात महाराष्ट्र पोलिसांना सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या लातूर पोलीस दलातील पोलिस अंमलदार सलमान नबिजी यांचा यथायोग्य सत्कार लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने, क्रीडा प्रशिक्षक रामलिंग शिंदे यांचीही उपस्थिती होती.
अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलास एकमेव स्वर्ण पदक मिळवून देणाऱ्या लातूरच्या पोलीस अंमलदाराचा हा सत्कार करताना आपल्याला आनंद होत असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सातव्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये जुदो क्लस्टर क्रीडा स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या सलमान नबीजी यांनी आपली कर्तबगारी दाखाऊन सुवर्णपदक जिंकले आहे.
लातूर पोलीस दलातील खेळाडू सलमान नबीजी यांनी 50 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे. सलमान नबिजी यांनी यापूर्वीही पंजाब येथे झालेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक जिंकले होते. सलमान नबीजी यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पिंचाक सिलात या खेळात महाराष्ट्र पोलिसांना पहिले सुवर्णपदक जिंकून देणारा महाराष्ट्र पोलीस दलातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. या उज्वल कर्तबगारी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सलमान नबीजी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने आणि क्रीडा प्रशिक्षक रामलिंग शिंदे यांचेही कौतुक केले आहे.