मोबाईल दुकान फोडणारा विधी संघर्ष बालक ताब्यात 3 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

मोबाईल दुकान फोडणारा विधी संघर्ष बालक ताब्यात 3 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

लातूर (एल.पी.उगीले) : अल्पवयीन बालकाला पुढे करून मोबाईलचे दुकाने फोडायचे आणि चोऱ्या करायच्या, त्या चोरीचा माल आणि मोबाईल बाजारात विक्री करायचे. असा प्रकार सर्रास होऊ लागला होता. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणाच्या तपासाला गती आली.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेस नाईट पेट्रोलिंग व अचानकपणे नाकाबंदीचे आयोजन करून वाहनांची व संशयास्पद इसमांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे सूचना व मार्गदर्शनात अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत नाईट पेट्रोलिंग सुरू होती.
दिनांक 07/11/2022 पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक तरुण रोडवर संशयास्पदरित्या वावरताना पेट्रोलिंग वरील पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली. तेव्हा तो भांबावून गेला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चाकूर येथील एका मोबाईल शॉप मध्ये चोरी केल्याचे कबूल केले.चोरी केलेल्या विविध कंपनीचे 10 मोबाईल तसेच मोबाईल ॲक्सेसरीज व लोखंडी टॉमी असा एकूण 3 लाख रुपयाचा मुद्देमालासह मिळून आला.
त्यामुळे विधी संघर्ष बालकास पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव चाकूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.सदर विधी संघर्ष बालकाने पोलीस ठाणे किंनगाव व अहमदपूर हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले असून त्या दिशेनेही तपास सुरू आहे.
अहमदपूर पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांनी सतर्क पेट्रोलिंग केल्यानेच चाकूर येथील मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्यास मुद्देमालासह ताब्यात घेता आले आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे अहमदपूर येथील पेट्रोलिंग वरील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, पोलीस अमलदार लक्ष्मण आरदवाड यांनी बजावली.

About The Author