उदगीर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबर रोजी
उदगीर (एल. पी.उगीले) : ज्या ग्रामपंचायतच्या मुदती संपलेल्या आहेत, अशा ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये उदगीर तालुक्यातील 26 ग्रामपंचायती, देवणी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती आणि जळकोट तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतचा समावेश आहे. सदरील ग्रामपंचायतीचे 18 डिसेंबर रोजी मतदान होणारा असून मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होईल. असे सदरील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दिनांक 18 नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावी, त्यानंतर 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर च्या दरम्यान नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक राहणार आहे. तर पाच डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. दिनांक सात डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे.
ज्या ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत त्या ग्रामपंचायतीतील उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध सात डिसेंबर रोजी केली जाईल. आवश्यक असल्यास 18 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
उदगीर तालुक्याच्या 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ती सर्व तयारी तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार निवडणूक विभाग संतोष गुट्टे हे करत आहेत.