तहसीलचे अधिकारी चांगले!! हाताखालच्यान्नी वेशीला टांगले!!!
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार हे सामाजिक जाणीव ओळखणारे अधिकारी असले तरी दुय्यम दर्जाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची इज्जत वेशीला टांगली आहे. विशेष करून पुरवठा विभागाने तर या महसूल विभागाचे दिंडवडे काढले आहेत, असे म्हटले तर नवल वाटू नये. शासनाच्या लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा ही शासनाची तळमळ, धाब्यावर बसउन पुरवठा विभागाने वाटेल तसा व्यवहार केल्याचे आरोप जाहीर पणाने अनेक ठिकाणावरून केले जात आहेत.
तहसील प्रशासनाला बदनाम करणारे हे झारीतले शुक्राचार्य चर्चेत असतानाच महसूल विभागात लिपिक असलेल्या कर्मचाऱ्यांनी किरकोळ कामासाठी लाच स्वीकारून महसूल विभाग हे लाचखोर असल्याचे चर्चेत आणले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे की, प्रशांत अंबादास चव्हाण हे महसूल सहाय्यक अर्थात लिपिक नेमणूक उदगीर तहसील कार्यालय येथे कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने लावलेल्या सापळ्यामध्ये ते रंगेहात सापडले आहेत.
यापूर्वी देखील त्यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी 2016साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना पुन्हा त्याच पद्धतीचा गुन्हा केल्याचेही संबंधित प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार यांच्या भाऊजी वर गुन्हा दाखल झालेला असताना सदर गुन्ह्यांमध्ये जामिनासाठी ऐपतदार प्रमाणपत्र अर्थात सालांशी प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील दरबारी कार्यरत असलेल्या प्रशांत अंबादास चव्हाण यांनी तक्रारदार यास दोन हजार रुपयाची लाचेची मागणी केली, आणि आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम देण्यासाठी तहसील कार्यालय उदगीर येथील महसूल विभागात बोलावले. आणि पंचा समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण तसेच पर्यवेक्षकीय अधिकारी पोलीस उपाधीक्षक पंडित रेजीतवाड, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्या पथकाने सदरील सापळा यशस्वी केला. या सापळ्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे महसूल विभागाचे काम माणुसकीची जाणीव ठेवून, वेळेचे बंधन बाजूला ठेवून काम करणारे कर्तबगार तहसीलदार रामेश्वर गोरे आणि त्यांचे सहकारी यांचे नाव मात्र विनाकारण अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे बदनाम होऊ लागले आहे. अशी चर्चा उदगीर शहरात चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती किंवा दलाल कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची रक्कम मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.