उदगीर साहित्यभुमी म्हणून नावारूपाला येत आहे – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहरात विविध जाती धर्माचे लोक राहत असून मागील काळात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर म्हटले की, अति संवेदनशील शहर म्हणून आपल्या उदगीर शहराची ओळख होती. मात्र या वर्षात उदगीर शहरात जवळपास चार वेगवेगळी साहित्य संमेलने झाली. त्यात 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचवेळी 16 वे विद्रोही साहित्य संमेलन व त्यानंतर पहिले महाराष्ट्र उर्दू साहित्य संमेलन व वारकरी साहित्य परिषदेच्या ११ व्या वर्धापण दिनानिमित्त एक दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संम्मेलन असे विविध साहित्य संमेलने आपल्या या उदगीर शहरात झाली आहेत.
आता आपले उदगीर शहर हे साहित्यभुमी म्हणून नावारूपाला येत असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते सदा फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत पहिल्या महाराष्ट्र उर्दू साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, उर्दू भाषेची नजाकत ही काही वेगळीच आहे, खास करून गझल, मुशायरा या काव्य प्रकारात उर्दू भाषेचा गोडवा अधिक जाणवतो. त्यामुळे ते विशेष लोकप्रिय आहे. आपल्या उदगीर शहरावर उर्दू आणि कानडी भाषेचा अधिक प्रभाव जाणवतो. ज्याप्रमाणे एखाद्या फुलांच्या हारामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुले आपण सजवतो त्यामुळे त्या हाराला सौंदर्य प्राप्त होते, तशाच पद्धतीने उदगीर परिसरामध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषेमुळे या परिसरातील साहित्याला एक वेगळाच दर्जा निर्माण झाला आहे. उर्दू ही भाषा भारतातच जन्माला आली, उर्दू भाषेचे पालन पोषण आर्य काळापासून आर्य परिवारात झाले. आपण ज्या भागात राहतो, त्या उदगीर व परिसरात दख्खनी भाषेचे राज्य होते. आणि दखनी भाषा ही उर्दू भाषेची आई आहे.
आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण चालावे. विशेषतः मुस्लिम बांधवांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. असा मौलिक सल्ला उपस्थितांना देवून येत्या काळात लोकाशाहीला मजबुत करण्याचे काम आपण सर्वांनी करुन लोकशाहीला आणि राज्य घटनेला जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. समाजामध्ये वावरताना आपले विचार सर्वांना सोबत घेवुन चालणारे पाहिजेत, तर आपला व आपल्या सर्वांचा विकास होतो. मी आमदार आणि मंत्री डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे होवु शकलो, म्हणून आपण सर्वांनी संविधान वाचले पाहिजे. सर्व महापुरूषांचा आदर्श घेवुन आपण जीवन जगले पाहिजे.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या जयंतीदिनी आपल्या या उर्दू साहित्य संमेलनाचा समारोप होत असल्याचे आ. बनसोडे यांनी सांगितले. या उर्दू साहित्य संमेलनासाठी माजी नगरसेवक अहमद सरवर व त्यांच्या पत्नी डॉ. अंजुम कादरी यांच्यासह सदा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून येत्या काळात आपणास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी केले. यावेळी मुस्लिम समाजबांधव, महिला व उर्दू भाषेवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.