तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

वरिष्ठ सहाय्यक कांचन पालवे एसीबीच्या जाळ्यात

लातूर (कैलास साळुंके) : सेवानिवृत्ती नंतरच्या प्रलंबित बिलाचा प्रस्ताव पंचायत समिती लातूर यांच्याकडे सादर करण्यासाठी लातूर जिल्हा परिषद येथील प्राथमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कांचन पालवे यांनी तक्रारदार पुरुषास तीन हजार रुपये लाचेची मागणी करत व ती स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार पुरुष (वय 59) यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या प्रलंबित बिलाचा प्रस्ताव पंचायत समिती लातूर यांच्याकडे सादर करण्यासाठी लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहाय्यक कांचन ज्ञानदेव पालवे (वय 45) यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच देण्याचे ठरले याविषयी तक्रारदार पुरुष यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिलेल्या तक्रारीवरून यशस्वी पडताळणी करत दि.8 मार्च रोजी पाच वाजण्याच्या सुमारास लातूर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचत वरिष्ठ सहाय्यक कांचन पालवे यांना जिल्हा परिषद लातूर येथील शिक्षण विभागातील लेखा कार्यालय तीन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे व लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी यांनी यशस्वी कार्यवाही केली आहे.

About The Author