विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर (एल.पी.उगीले) : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार ०१ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२३ रोजी ज्यांचे वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज नमुना क्र.६ भरावा. तसेच सोबत जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि रंगीत छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.
मतदार यादीतील नावात दुरुस्ती किंवा ठिकाण, पत्ता बदल, छायाचित्र बदलणे किंवा दुसरे ओळखपत्र हवे असल्यास अर्ज नमुना क्र. ८ भरून दुरुस्ती करावयाच्या तपशीलाशी संबंधित पुरावा जोडावा. मयत, दुबार अथवा कायम स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी अर्ज नमुना क्र. ७ भरावा. सोबत मयत मतदाराचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे. तसेच स्थलांतरीत मतदाराचे सध्या राहत असलेल्या वास्तव्याचा पुरावा जोडावा. मतदार यादीसोबत आधार जोडणी करण्यासाठी अर्ज नमुना क्र. ६ ब भरून आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा.
मतदार नोंदणी, मतदार यादीसोबत आधार क्रमांक जोडणी, दुबार अथवा मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीतील तपशील बदलण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ८ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन स्वरुपात www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App च्या माध्यमातून सादर करावे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत असे अर्ज हस्तलिखित स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फतही स्वीकारले जाणार आहेत.
मतदार यादीतील त्रृटी टाळून अर्जांचे संगणीकरण सोयीचे होण्यासाठी मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लातूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, औसा-रेणापूर व लातूरचे तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.