राज्याला पुढं घेऊन जाणारा अर्थसंकल्प
आमदार धिरज देशमुख यांचे मत; विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेला बळकटी
लातूर (प्रतिनिधी) : कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्याचे अर्थचक्र संकटात सापडलेले असतानाही महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अनेक योजनांवर भर दिला आहे. सर्व घटकांचा विकास साधत राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर झाला. या पार्श्वभूमीवर, श्री. धिरज देशमुख बोलत होते. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेच्या नवीन बाह्य रुग्ण इमारतीच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात 73 कोटी 29 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याबद्दल मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांचे श्री. धिरज देशमुख यांनी आभार मानले.
श्री. धिरज देशमुख म्हणाले, कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक स्थिती सावरण्याचे मोठे आव्हान समोर आहे. अशा स्थितीत सर्व घटकांचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला असून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. याशिवाय, कर्करोग निवारणासाठी तालुका स्तरावर योजना, राज्यात 8 मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक कँथलॅब, अनेक जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संसर्गजन्य आजारासंदर्भात सेवा रुग्णालये असे आरोग्यविधक विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
‘… हा ऐतिहासिक निर्णय’
कृषी क्षेत्राशी संबंधित दमदार योजना जाहीर करून शेतकऱ्यांना अधिक पाठबळ अर्थसंकल्पातून देण्यात आले आहे. शून्य टक्के व्याजाने पीककर्ज हा ऐतिहासिक निर्णय शेतकरी बांधवाना दिलासा देणारा आहे. शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, उद्योग, जलसंपदा, मृद व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास विभागासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचे व महत्त्वपूर्ण निर्णयांचे मी स्वागत करीत आहे, असेही ते म्हणाले.
मुंबईत ‘विलासराव देशमुख मार्ग’
दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाचे ‘विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या मार्गाच्या नामकरणासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पाठपुरावा केला होता. याबद्दल श्री धिरज देशमुख यांनी अजित पवार, अस्लम शेख आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.