पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त तुर पिकाची पाहणी

पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त तुर पिकाची पाहणी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : अवेळी झालेला जास्तीचा पाऊस आणि त्यानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे लातूर जिल्हयात अनेक ठिकाणी भरात आलेले तुरीचे उभे पिक करपून गेले आहे. अहमदपूर तालुक्यातील भवानवाडी येथील दिनुनाथ चामे यांच्या शेतावर जाऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी  बुधवार २३ डिसेंबर रोजी नुकसान झालेल्या तुर पिकाची पाहणी केली. पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, तसेच वीमा कंपनीकडेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी पाठपूरावा करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.

   मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत आहे. ही बाब लक्षात घेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी यांनी अहमदपूर तालुक्यातील भवानवाडी भागास भेट देऊन दिनुनाथ चामे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या तुर पिकाची पाहणी केली. सततच्या पावसामुळे  बहारदार आलेले तुरीचे उभे पिक करपून गेले आहे. सततच्या पावसामुळे हवामानात बदल होवून तुर या पिकावर फायटोपथोरा ब्लाईट (खोडावरील करपा), फ्युजारियम विल्ट(मर) आणि रूट रॉट (कोरडी मुळ कुज) या रोगाचा प्रादूर्भाव झाला असून त्यामुळे हे पिक हातचे गेल्याचे कृषी अधिकारी गौसाने यांनी पालकमंत्री यांना सांगितले. नुकसान झालेल्या या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा. तसेच विमा कंपनीकडेही पाठपूरावा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निर्देश पालकमंत्री यांनी महसुल तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

या पाहणी दरम्यान अहमदपूर चाकुर मतदार संघाचे आ. बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री यांना निवेदन देऊन तुर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
  यावेळी माजी आ. त्र्यंबक नाना भिसे, दिनूनाथ चामे, यांच्यासह परिसरातील शेतकरी, जिल्हा कृषी अधिकारी श्री गवसाने यांची उपस्थिती होती.

About The Author