गोवर आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधा – डॉ. तेलगाने

गोवर आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधा - डॉ. तेलगाने

उदगीर (एल.पी.उगीले) : गोवर हा आजार विषाणूपासून होणार असल्याने, गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो. व संपर्कात आलेल्या व्यक्तीला श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करून लागण होते. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता, तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. आणि काळजी घ्यावी. तसेच हा संसर्गजन्य रोग असल्याने घरातील इतरांनी ही काळजी घ्यावी. असे आवाहन उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शरद कुमार तेलगाने यांनी केले आहे.

ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात आठ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे अशा प्रकारचे एक दोन लक्षणे आढळून येतात. दोन चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे. ते कानाच्या मागे, चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. असेही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉ. शरद तेलगाने यांनी स्पष्ट केले आहे.

गोवर झालेल्या रुग्णांना त्यांच्या शरीरात अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी झालेले असते, त्यामुळे अ जीवनसत्व त्या रुग्णाला तातडीने उपलब्ध करून द्यावे. रुग्णाला डोळ्याचे आजार व अतिसार, निमोनिया, मेंदूजवर असेही आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास, हे आजार होण्याची शक्यता कमी असते. तसेच गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर /रूबेला लसीकरण झाले नसेल तर त्यांचे लसीकरण लगेच करून घ्यावे. असेही आवाहन त्यांनी केले आहे.

आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते बारा महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिने, या वयोगटात देण्यात येतो. गोवरचे लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असेही आवाहन डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

About The Author

error: Content is protected !!