निष्ठेने शिवसेना वाढवू, बाळासाहेबांचा विश्वास टिकऊन ठेवू – कैलास पाटील
उदगीर (एल. पी. उगिले) : बाळासाहेबांच्या विचारांची मशाल उदगीर तालुक्यातील घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनापर्यंत तेवत ठेवून, एकनिष्ठपणे राहून शिवसेनेची सेवा करून बाळासाहेबांच्याप्रती असलेली निष्ठा व्यक्त करण्याची वेळ आली आहे. आज शिवसेनाप्रमुख, शिवसेनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे जाऊन दहा वर्षे झाली. त्यानंतर बरीच स्थित्यंतरे झाली, मात्र शिवसेनेच्या शिवधनुष्याला कधी कुणी हात घातला नाही. अशा परिस्थितीत आज गद्दारांनी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मला विश्वास आहे, शिवसेना पुन्हा दुप्पट ताकतीने उभा राहील. शिवसैनिक त्वेशाने पेटून उठले आहेत. शिवसेना तोडण्याचा प्रयत्न कदापि शक्य होणार नाही. जनता गद्दारांना धडा शिकवेल, असा मला विश्वास आहे. असे विचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी व्यक्त केले.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ मार्गदर्शक श्रीमंत दादा सोनाळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, युवा सेनेचे शैलेश वडगावे, शिवसेनेचे जुने कार्यकर्ते व्यंकट अण्णा साबणे, पुरी, हैबतपुरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कैलास पाटील यांनी सांगितले की, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सतत सांगायचे, वडिलांनी मला एक मंत्र दिला आहे, ज्योतिषाकडे कधीही जाऊ नकोस. कुंडली दाखवू नकोस. हात दाखवू नकोस, तुझा कुठला ग्रह कुठल्या घरात बसला, याची पर्वा करू नकोस, तुझ्याकडे जर आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला मरण नाही. हीच प्रेरणा, हाच आत्मविश्वास घेऊन आता शिवसैनिक दुप्पट जोमाने कामाला लागतो आहेत. गद्दारांना धडा शिकवणे हा तर विचार आहेच, आहे. त्यासोबतच शिवसेनेचे वर्चस्व सर्वच क्षेत्रात वाढले पाहिजे. यादृष्टीनेही काम करणे गरजेचे असल्याचेही कैलास पाटील यांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुखांच्या सोबत जिल्ह्यात शिवसेनेला नवी ताकद मिळवून देण्यासाठी सर्व शिवसैनिक निष्ठेने कामाला लागल्याची ग्वाही देखील याप्रसंगी कैलास पाटील यांनी दिली.