उदगीरात बालवाड:मय साहित्य पुरस्काराचे वितरण.
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे सन २०२१ चे बालवाड:मय पुरस्काराचे शनिवार सायंकाळी ४:३० वा उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय सभागृहात वितरण करण्यात येणार आहेत.
अध्यक्षस्थानी मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरूके उपस्थित राहणार आहेत. परभणी येथील सुप्रसिध्द साहित्यिक, कवी केशव खटींग यांच्या शुभ हस्ते या पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया हे उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारासाठी मुंबई येथील रमेश तांबे, कोल्हापूरच्या नीलम माणगावे तर नांदेडचे वैजनाथ अनमुलवाड यांची निवड करण्यात आली आहे.
यात कै. राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार मुंबई येथील रमेश तांबे यांच्या “चिनूचे स्वप्न” या बालकादंबरीस, कै. लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार नांदेड येथील वैजनाथ अनमुलवाड यांच्या “रंग सारे मिसळू द्या !” या बालकविता संग्रहाला तर कै. विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार कोल्हापूर येथील नीलम माणगावे यांच्या “बिलोरी कवडसे” बालकथा संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५०५१ / – रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन शनिवारी सायंकाळी गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रतिनिधी संजय ऐलवाड, अध्यक्ष प्रा. रामदास केदार, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, कार्यवाह रसूल दा. पठाण, सहकार्यवाह अनिता यलमटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योती डोळे, प्रा. बिभीषण मद्देवाड, अंकुश सिंदगीकर, अंबादास केदार, प्रा. राजपाल पाटील, चंद्रदीप नादरगे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्यांनी केले आहे.