सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन राहते – आ. संजय बनसोडे

सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन राहते - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय संस्कृतीमध्ये निरोगी शरीर आणि सुदृढ मन यासाठी योगा आणि व्यायाम याला अन्याय साधारण महत्त्व सांगितले आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येक माणूस आपापल्या धावपळीच्या कामामुळे ताणतणावात जगतो आहे. तसेच स्वतःकडे किंवा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायलाही त्याला वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आपण किती व्यस्त होऊन काम करतो, याचे भान ठेवून काही वेळ आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे. आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आपण दररोज आपल्या कामकाजाचा वेळ बाजूला ठेवून एक तास तरी नियमित व्यायाम करावा. यामध्ये योगासोबतच प्राणायाम आणि योगासनांनाही वेळ द्यावा. ज्या लोकांना शक्य आहे किंवा जिथे जिथे सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करा. आपणास निरोगी आयुष्य जगायचे असेल तर व्यायाम करणे हाच एकमेव पर्याय आहे. असे विचार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर येथील रॉयल फिटनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे नवनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, शिवकुमार कांबळे, व्यंकटराव पाटील, गौतम पिंपरे, विद्यासागर डोरनाळीकर, राजकुमार गंडारे उमाकांत गंडारे, शिवकुमार कांबळे, संघशक्ती बलांडे, बाबासाहेब सूर्यवंशी, बाबुराव आंबेगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की, मागील दोन वर्षाच्या काळात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक क्षमता ज्यांच्या शरीरात आहे, अशा लोकांना संसर्ग लवकर झाला नाही. तसेच प्रतिकारक्षमता असेल तर कोणत्याही रोगापासून शरीर संरक्षण करते. त्यामुळे ही रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रत्येकाने चांगला आहार घेणे आणि व्यायाम करणे या मूलभूत गरजा आहेत. सुदृढ शरीरामध्ये सुदृढ आत्मा आणि सुदृढ मन राहते. धावपळीच्या जगात जीवनशैली बदलली असली तरी प्रत्येकाने व्यायामाला वेळ द्यावा. तसेच बेकारी, बेरोजगारीमुळे तरुण वर्ग व्यसनाधीनते कडे वळत आहेत, हे थांबले पाहिजे. कारण युवक हेच उद्याचे देशाचे भविष्य असल्याने युवकांच्या बाबतीत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सुदैवाने आपल्या भागात रॉयल जिम सुरू करण्यात आले आहे. निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

About The Author