वयोवृद्धांना दृष्टी देण्यासारखे पुण्य कर्म दुसरे नाही – बालिका मुळे
उदगीर (एल. पी. उगीले) : जीवन जगत असताना डोळे हे सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. निसर्गाची सौंदर्याची संकल्पनाच डोळ्यात साठवलेली असते. त्यासाठीच वयोवृद्धांना पुन्हा दृष्टी मिळावी, यासाठी उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाने सुरू केलेला दृष्टिदानाचा यज्ञ आपल्या परीने यशस्वी करावा. या भूमिकेतून शिक्षक महिला आघाडी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी नेत्ररोग निदान शिबिर व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्याचा प्रयत्न मी करत आहे. असे उद्गार शिक्षक महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बालिका मुळे यांनी व्यक्त केले.
त्या अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड येथे लातूर जिल्हा शिक्षक महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र रोग निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. उदगीर येथील उदयगिरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने या रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तज्ञ डॉक्टर्स आणि सहकारी उत्कृष्टपणे काम करत आहेत. ते काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे, या उद्देशाने एक दुवा बनण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवनखेड येथील कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी गणपतराव भंडारे, चेअरमन रामकिशन शिंदे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अजित सिंह जमादार, रूपाताई जमादार, डॉ. सचिन निलंकर व त्यांचे सर्व सहकारी तसेच बाबासाहेब शिंदे, सौदागर सद्दाम, गुरमे प्रकाश, डॉ. प्रशांत गायकवाड इत्यादी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होते.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 250 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक असणाऱ्या वृद्धांच्या डोळ्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यानंतर त्यांना चष्म्याचेही वाटप करण्यात आले. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने अंधत्व निवारणासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्या कामांमध्ये प्रत्येक नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी, संघटनांनी पुढाकार घेऊन समाजातून अंधत्व निवारणासाठी पुढाकार घ्यावा. असेही आवाहन याप्रसंगी बालिका मुळे यांनी केले.