प्रशासनाचे दुर्लक्ष: अर्धवट रस्ता, पुलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अर्धवट पुलाला सीडीचा वापर, पिकांच्या राशी रानातचं!
अहमदपूर:-( गोविंद काळे )वैरागड साठवण तलाव झाल्यामुळे मन्याड नदीवर बांधलेला अर्धवट पूल आणि रस्त्याच्या नजीक पाणीसाठा मुबलक असल्यामुळे विळेगावच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकडे जाण्यास रस्ताच नाही. अर्धवट पुलाला शिडीचा आधार घेऊन पायी शेती कडे जाता येते. रस्त्या अभावी खरीप पिकांच्या राशी शेतातच अडकून आहेत, तरी तो अर्धवट रस्ता आणि पुलाचे काम त्वरित करावे असे निवेदन विळे गावच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय अहमदपूर यांना दिनांक 21 रोजी दिले आहे.
सदर निवेदनात विळेगावच्या शेतकऱ्यानी म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षापासून व्होटाळा-वैरागड रस्ता व त्यावरील अर्धवट पुलाचे काम रखडले आहे. वैरागड साठवण तलाव झाल्याने मन्याड नदीवर असलेल्या अर्धवट पुलामुळे आम्हा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतात आलेली पीक, धान्य घरी आणण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठे अडचण येत आहे. शेताकडे पाईसुद्धा जाता येत नाही. अर्धवट पुलावरून शिडीचा वापर करावा लागतो. सद्यस्थितीला खरीप पिकांच्या राशी शेतातच पडून आहेत. उसाची तारीख होऊन सुद्धा कारखान्याला नेण्यासाठी वाहन जाऊ शकत नाही. परिणामी आमचे मोठे नुकसान होत असून प्रचंड मानसिक त्रास होत आहे. आत्महत्येचे विचार डोक्यात येत आहेत. तरी अर्धवट रस्ता, आणि पूल त्वरित तयार करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा आठ दिवसानंतर आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा गर्भित इशारा ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांना दिला आहे. सदर निवेदनावर गजानन डुब्बेवार, लक्ष्मीकांत डुब्बेवार, संतोष डुब्बेवार, श्रीकांत डुब्बेवार, उमाकांत डुब्बेवार,धनंजय शेळके,विक्रम मैद, राम तेलगे, सचिन शेळके, सौ.अनुसया संतोष डुब्बेवार,चंद्रकांत डुब्बेवार, नारायण डुब्बेवार, रमाकांत डुब्बेवार, मंचक शेळके, जावेद शेख, स्वाती डुब्बेवार, रामराजे बेंबडे, वामन शेळके, व्यंकटी शेळके, पार्वतीबाई डुब्बेवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.