संगांयोची व्यापक जनजागृती करुन निराधारांना आधार देऊ

संगांयोची व्यापक जनजागृती करुन निराधारांना आधार देऊ

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत प्रवीण पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

लातूर (प्रतिनिधी) : समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख व लातूर ग्रामीण चे आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या सुचनेनुसार लातूर ग्रामीण संगांयो समिती व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवून अधिकाधिक निराधारांना आधार देण्याचे कार्य करेल, असा विश्वास लातूर ग्रामीणच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील यांनी केले.

या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून लातूर ग्रामीणची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती व जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त संगांयोसंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या संगांयो योजनेचा उद्देश, स्वरुप, त्यासाठीच्या पात्रता व जनजागृती यावर श्री प्रवीण पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार, बाल कल्याण समिती सदस्या श्रीमती अँड. सुजाता माने, कौटुंबिक न्यायालय लातूर चे विवाह समुपदेशक सचिन मोरे, नायब तहसीलदार रत्नाकर महामुनी, जिल्हा परिविक्षा अधिकारी डी. ए. कारभारी, परिविक्षा अधिकारी व्ही. एन. देवकर, ए. एस. थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अॅड.धम्मानंद कांबळे, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र समन्वयिका श्रीमती मंगल मगर, संगायोचे सदस्य संजय चव्हाण आदी विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लातूरच्या ग्रामीण भागातील निराधार, वृद्ध व्यक्ती, दिव्यांग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, घटस्फोटीत महिला वा घटस्फोट प्रक्रियेतील महिला, परित्यक्ता, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी आदींना संगांयोच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेची माहिती संबंधितांपर्यंत पोहचवून अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी संगांयो समिती प्रयत्नशील असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

संजय गांधी निराधार योजनेची माहिती विधवा, घटस्फोटीत वा घटस्फोट प्रक्रियेतील महिला,अत्याचाराने पिडीत महिला, निराधार महिला, तृतीयपंथी आदीपर्यंत पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिला व बालविकास विभाग सहकार्य करेल, असा विश्वास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांनी व्यक्त केला. यावेळी बाल कल्याण समितीच्या सदस्या श्रीमती अॅड. सुजाता माने यांनीही आमच्या संस्थेच्या माध्यमातून संगांयोची ही योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार श्री. रत्नाकर महामुनी यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती मंगल मगर यांनी सुत्रसंचलन तर श्रीमती संध्या तिडके यांनी आभार मानले. या कार्यशाळेस उपस्थित जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, लातूर, कौटुंबिक न्यायालय, लातूर व सखी वन स्टॉप सेंटर, लातूर चे अधिकारी व कर्मचारी यांना संगायो च्या शासन निर्णयांची प्रत देण्यात आली.

About The Author