महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी आज मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर पुणे येथील आर्युवेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांच्या ‘प्रिस्टाइन’ कंपनीकडून डॉ.गजानन मोरे हे तपासणी करणार असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे माजी अध्यक्ष स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज दि. २९नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील आर्युवेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांच्या ‘प्रिस्टाइन’ या आर्युवेदिक कंपनीने लाखो लोकांचे आरोग्य तपासणी करून त्यांना नवजीवन दिले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बीपी, दम – धाप लागणे, किडनी समस्या, वात- पित्त- ऍसिडिटी, कॅन्सर ,शुगर, मूळव्याध, जॉईंट पेन , पॅरॅलीसीस , मुतखडा, हाडाचे आजार, थायरॉईड ,वजन वाढणे – वजन कमी असणे . यासह इतर आजारावर मोफत निदान व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देऊन महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आरोग्य चांगले असेल तर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य निकोपपणे होते, ही किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै.अशोकराव पाटील एकंबेकर यांची भूमिका होती.व त्या दिशेने ते कृतीशील वाटचाल करीत होते, असे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील एन. एस. एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. डी. चिलगर यांच्या नियंत्रणाखाली होणार असल्याचे त्यांनी म्हटले. या शिबिरामध्ये सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संयोजक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी केले आहे.
