तहसीलदार म्हणून रामेश्वर गोरे लय भारी !! गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असाच असावा तालुका दंडाधिकारी!!!
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील अनेक खेडेगावांतुन आपापसातील किरकोळ वादाचे कारण, हेवेदावे यामुळे अनेकांनी आपले विरोधक समजले जाणारे शेतकरी यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी, पारंपारिक असलेला रस्ता अडवून त्यांची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. वर्षानुवर्ष अशा पद्धतीचे प्रश्न प्रलंबित होते. अनेक ठिकाणी कोर्टकचेरीत शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न अडकून पडले होते. न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्यामुळे त्या संदर्भात कोणीही फारसे गांभीर्याने घेत नव्हते, किंवा मध्यस्थी करून तडजोड करण्याचा कोणी प्रयत्नही करत नव्हते.
नाही म्हटले तरी, उदगीर येथे तालुका न्यायदंडाधिकारी अर्थात तहसीलदार म्हणून व्यंकटेश मुंडे आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वादग्रस्त असलेल्या अनेक प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देऊन तुमचा आपसातील वाद काही असू द्या, मात्र शेतीसाठी जाणारा रस्ता मोकळा झाला पाहिजे. शेतीमध्ये अन्नधान्य पिकवण्यासाठी बी बियाणे, खत घेऊन जाण्यासाठी तसेच शेतीमध्ये पिकलेला माल बाजारापर्यंत आणण्यासाठी रस्ता असला पाहिजे. ही भूमिका घेऊन अनेक वाद मिटवले होते. तीच परंपरा कायम ठेवत आपला एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे करत आहेत. असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.
उदगीर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या पारंपारिक रस्ते त्यांनी मोकळे केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. असेच एक प्रकरण उदगीर तालुक्यातील वाढवणा (बू.) येथील आहे. या ठिकाणी जमीन सर्वे नंबर 191 गट नंबर 579 च्या पूर्वेकडील बाजूने गट नंबर 580 व 576 मध्ये शेतात जाण्या- येण्यासाठीचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता, रुपेश रमेश थोटे व सौरभ रमेश थोटे यांनी पारंपारिक अस्तित्वात असलेला रस्ता अडविल्यामुळे त्यापलीकडे असलेल्या शेतकऱ्यांना ऊसतोड केल्यानंतर ऊस कारखान्यावर पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नव्हता. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी न्यायालयामध्येही दाद मागितली होती. त्यानंतर तालुका दंडाधिकारी यांच्याकडेही अर्ज फाटे केले होते. तरी देखील सदरील रस्ता मोकळा केला जात नव्हता. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन तक्रारदारांनी आपल्याला न्याय मिळेल याची खात्री वाटल्यामुळे रामेश्वर गोरे यांच्याकडे आपली कैफियत सांगितली.
त्यानंतर तालुका दंडाधिकारी यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख उदगीर,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढवणा, मंडळ अधिकारी वाढवणा आणि तलाठी सज्जा वाढवणा यांना पत्र देऊन जाय मोक्यावर जाऊन सदरील ठिकाणची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, सामंजस्याने या प्रश्नाचे गांभीर्य विचारात घेऊन प्रश्न निकाली काढावा. असे आदेश पारित केले होते.
त्याप्रमाणे उदगीर येथील भूमी अभिलेख उपाधिक्षक कार्यालयाचे भूमापक डी. व्ही. शिंदे, तलाठी आकाश अलुरे, तानाजी शिंदे, मंडल अधिकारी गणेश हीवरे यांनी अर्जदार व गैरअर्जदार तसेच गावकरी या सर्वांना एकत्र करून, या संदर्भात चर्चा करून पारंपारिक पद्धतीने वहिवाट असलेला सव्वा आठ फूट रुंदीचा रस्ता अतिक्रमण मुक्त करून पुढील शेतकऱ्यांचा शेतमाल,तसेच ये जा करण्यासाठी रस्ता मोकळा केला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आपसातील भांडणे बाजूला ठेवून राष्ट्रीय हित विचारात घेऊन शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. अशी भूमिका तालुका दंडाधिकारी म्हणून रामेश्वर गोरे यांनी घेतल्याबद्दल वाढवणा परिसरातील शेतकरी त्यांचे अभिनंदन करत आहेत.
