गोरगरीबांचे घरकूलाचे स्वप्न साकार होणार..!!
अहमदपूर स.नं.4 वरील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अतिक्रमण नियमानूकूल करण्यास हिरवा कंदील
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील स. नं.4 वरील अतिक्रमण प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नियमानूकूल करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक यांनी शिथीलता दिल्याने आता कबालनामे मिळण्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे अशी माहिती युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना त्यांनी सांगीतले की,येथील सर्व्हे नंबर 4 या शासकीय जागेवर गेल्या साठ वर्षा पासून नागरिकांचे अतिक्रमण आहे.हे अतिक्रमण कायम करून कबालनामे द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.जागेचे कबालनामे मिळावे म्हणून वेळोवेळी विविध पक्ष,संघटना, लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाले होते पण यश आले नव्हते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्यांना सूध्दा घरकूलाचा लाभ देण्याचे शासनाचे आदेश आहेत तसेच अभिन्यासातील कांही बाबीला शिथीलता आवश्यक असल्यास संचालक नगररचना,पूणे यांची मान्यता घेण्याचे नमूद होते. त्या नुसार प्रस्ताव पाठविण्यात आला होता.दोन वर्षाच्या प्रतिक्षेत नंतर शेवटी या प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.
या मंजूरी मूळे आता कबालनामे मिळणार असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तब्बल अडीचशे लोकांना घरकूलाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.गोरगरीब अल्पसंख्याक समुदायाचे घरकूलाचे स्वप्न साकार होणार आहे.एकत्रीत पणे एवढ्या मोठ्या संख्येने ही घरकूल पहिल्यांदाच साकार होणार असून हा प्रकल्प निश्चितपणे पथदर्शी ठरेल असा विश्वास या वेळी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी वेळो वेळी मदत केल्या बद्दल माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे,राज्याचे नगररचना संचालक,नगर रचना उपसंचालक औरंगाबाद, तत्कालिन जिल्हाधिकारी श्री.जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज साहेब,जिल्हाप्रशासन अधिकारी सतिश शिवणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मूळे,सहाय्यक संचालक नगररचना लातूर मिटकरी,न.प.मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे,नगरसेवक डाॅ.फूजैल जहागीरदार आदींचे स.नं.4 चे शासकीय अतिक्रमण नियमानूकूल करण्यासाठी प्रकरणाचा पाठपूरावा करणारे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.