दिव्यांगा बाबत सामान्य जनतेत जनजागृती व्हावी – प्राचार्या रेखाताई तरडे
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले परंतु समाजामध्ये अद्याप दिव्यांगांना उपेक्षित वागणूक दिली जाते. म्हणून जनजागृती व्हावी. असे प्रतिपादन भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा संस्थासचिव प्राचार्या रेखाताई तरडे यांनी केले. त्या येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तीचा सन्मान करताना बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांग आदर्श शिक्षिका मीना कल्याणी, बालाजी फुलमंटे, मोहिनी हांडे,भानुदास माने, प्रकाश केंद्रे, ग्रामविकास अधिकारी अशोक केंद्रे, आशा रोडगे, उध्दव शृंगारे उपस्थित होते.
प्रथमतः ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. इयत्ता तिसरीतील आरोही बावगे, कोतपोलु आर्या ,जवणे अमृता, वैदेही तांदळे या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने उपस्थित मान्यवराचे शब्द सुमनांनी स्वागत केले. यावेळी दिव्यांग माजी विद्यार्थी तिरुपती बोधनकर ,भानुदास माने ,तसेच चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग पालक यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी चौथी वर्गातील नेळगे अनुष्का, ज्ञानेश्वरी सूर्यवंशी ,अपूर्वा मोघे ,आराध्या राठोड ,जाधव अनुष्का, रिसिता क्षेत्रपाळे या विद्यार्थिनींनी दिव्यांगा विषयी वाटाड्या ही नाटिका सादर केली. प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा,चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन तिसरीतील विद्यार्थिनी श्रावस्ती साने, संस्कृती शिंदे यांनी केले तर आभार विराज कदम या चिमुकल्याने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
